Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हायला हवा – प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर

पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. पुण्यात मोठया प्रमाणात तरुणाई शिक्षण आणि व्यवसायासाठी येते. आता विद्यापीठांचे शहर म्हणून देखील पुणे हे नावलौकिकास येत आहे. जगात भारताचे नाव पुढे नेणारे विद्यार्थी पुण्यातून तयार होतील. त्यामुळे आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग केवळ स्वत:साठीच नाही, तर समाजासाठी होणे गरजेचे आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे पुण्याच्या विविध भागांतील २२५ गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य प्रदान कार्यक्रमाचे आयोजन बुरुड आळी येथे करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व विधीज्ञ अ‍ॅड. एस.के.जैन, ज्येष्ठ उद्योजक रमण लुंकड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, उद्योजक विजयकुमार मर्लेचा, सामाजिक कार्यकर्ते श्याम मारणे, शाहीर हेमंत मावळे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. वेकिंग इंडिया लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बालाजी राव व वेकिंग उद्योग समूहाचे संचालक व्यंकटेश राव यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला.

अ‍ॅड. एस.के.जैन म्हणाले, आजच्या पिढीला वाचनाची आवड लावणे गरजेचे. पुस्तक आधी मोबाईल नंतर असे केले, तरच समाजाचे भले होईल. आई-वडिलांना नमस्कार करुन घराबाहेर पडण्याचे संस्कार लहान मुलांवर होणे गरजेचे आहे. मुलांनी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. तसेच वाचनातून आलेल्या चांगल्या गोष्टींचा अवलंब दैनंदिन जीवनात करायला हवा. भारत हा तरुणांचा देश आहे. आजची पिढीच ख-या अर्थाने देशाला पुढे नेऊ शकते.

प्रास्ताविकात निवृत्ती जाधव म्हणाले, चुनाभट्टी, जनता वसाहत, दांडेकर पूल, दत्तवाडी, अप्पर इंदिरानगर, मंगळवार पेठ, जुना बाजार, पर्वती दर्शन, सोमवार पेठ, अरण्येश्वर, गणेश पेठ अशा विविध भागांतील गरजू मुला-मुलांनी शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली. धार्मिकतेतून विधायकतेकडे हे ब्रीद अंगिकारुन ट्रस्ट कार्यरत असून जमा होणारा निधी सामाजिक उपक्रमांद्वारे गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading