सावरकर या क्रांतीसूर्याचे दुर्दैव अजूनही संपले नाही – सूर्यकांत पाठक
पुणे : मागील काही वर्षात अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सावरकर यांचे नाव झाले आणि लोकांना त्यांचे नाव घ्यायला अभिमान वाटू लागला. परंतु काँग्रेस नेत्यांनी माफीवीर म्हणून त्यांना संबोधले, अनेकांनी सावरकर ब्राह्मणांचे, महात्मा फुले माळींचे, असे वर्गीकरण केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी अनेक यातना सहन केल्या त्या स्वातंत्र्यवीर सावरकर या क्रांतीसूर्याचे दुर्दैव अजूनही संपले नाही, असे मत सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मंडळाच्या वतीने ह.त्र्यं. देसाई लिखित शतपैलू सावरकर पुस्तकाचा प्रकाशन समारंभ वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विंग कमांडर विनायक डावरे (नि.), मंडळाचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर, सुरेश आबादे, भरत देसाई उपस्थित होते.
सूर्यकांत पाठक म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुणेकरांचा जवळचा संबंध आहे. सावरकरांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम पुणेकरांनी केले. शतपैलू सावरकरांचे या पुस्तकात त्यांचे ६६ विविध पैलू उलगडण्यात आले आहेत. सावरकरांचे विचार घरोघरी आणि पुढच्या पिढीत रुजवायचा असेल तर सावरकर वाङमय घरोघरी वाचले गेले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विनायक डावरे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य सूर्य आहेत. त्यांच्यावर मराठीपेक्षा हिंदीमध्ये जास्त पुस्तके असून, मराठी पेक्षाही उत्तर हिंदुस्थानात जास्त सावरकर प्रेमी लोक आहेत. हिंदुहृदयसम्राट ही पदवी सर्वप्रथम सावरकरांना मिळाली आहे. शिवाजी महाराजांनंतर हिंदूंना प्रेरणा देणारा महापुरुष सावरकरांच्या रूपात जन्माला आला. त्यांना भारतरत्न देण्याची आवश्यकता नाही, कारण ते भारतरत्न आहेतच. शतपैलू सावरकर हे पुस्तक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
