Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

मारकडवाडी गावात आता राहुल गांधी यांची एन्ट्री होणार

सोलापूर: प्रतिनिधी

निवडणूक यंत्राला सामूहिक विरोध करून केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावात आता विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची एन्ट्री होणार आहे.   गांधी यांच्या नेतृत्वाखाली लॉन्ग मार्च काढला जाणार आहे. मतदान यंत्रांच्या विरोधातील या ठिणगीचा वणवा देशभर पेटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. 

यापूर्वी मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या गावातील मतदानाची आकडेवारी मान्य नसल्याचा दावा करीत मतपत्रिकेवर अभिरूप मतदान घेण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून ती नाकारण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी मतदान यंत्राची प्रतिकृती फोडून तिचे दहन केले. याच वळी सोलापुरातील ईव्हीएम विरोधी कृती समितीने आंदोलनाचा पुकारा दिला. या आंदोलनात जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते सहभागी झाले होते. 

वंचित बहुजन आघाडी राज्यव्यापी आंदोलनाच्या पवित्र्यात

वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही मतदान यंत्राच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाची सुरुवात मतदान यंत्र विरोधी स्वाक्षरी मोहिमेने करण्यात येणार आहे. त्यानुसार 16 तारखेपर्यंत राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. कालांतराने हे आंदोलन अधिक व्यापक व तीव्र केले जाईल, अशी माहिती वंचितच्या वतीने देण्यात आली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading