पुणेकरांनी घेतला भारतीय व पाश्चिमात्य संगीताचा आनंद
पुणे : जगप्रसिद्ध डॅनिश सॅक्सोफोन वादक, संगीतकार लार्स मोलर यांचे वादन, मेहेर परळीकर यांचे ख्याल गायन आणि फारुखाबाद घराण्याचे दिग्गज तबलावादक पं अभिजित बॅनर्जी यांच्या एकल तबलावादनाने पुणेकरांनी भारतीय व पाश्चिमात्य संगीताचा आनंद घेतला. निमित्त होते ध्वनी अकादमीच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘पेहेल २०२४’ या सांगीतिक कार्यक्रमाचे. एरंडवणे येथील सेवा भवन सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसार आणि प्रचारासाठी कार्यरत असलेल्या ध्वनी अकादमीच्या वतीने आयोजित ‘पेहेल २०२४’ या कार्यक्रमाची सुरुवात जगप्रसिद्ध डॅनिश सॅक्सोफोन वादक, संगीतकार असलेल्या लार्स मोलर यांच्या वादनाने झाली. त्यांनी यावेळी राग श्री प्रस्तुत करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सेक्सोफोनच्या माध्यमातून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील राग ऐकणे हे उपस्थितांसाठी जणू पर्वणी ठरली. यावेळी शोमोजित चॅटर्जी यांनी मोलर यांना समर्थ तबलासाथ केली.
यानंतर कोलकाता येथील सुप्रसिद्ध आयटीसी रिसर्च अकादमीचे विद्यार्थी व पंडित अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य असलेल्या मेहेर परळीकर यांनी ख्याल गायन सादर केले. यावेळी त्यांनी राग रागेश्रीची बहारदार प्रस्तुती केली. परळीकर यांना तबलावादक अभिजित भट्टाचार्य यांनी तबला तर सुधीर टेकाळे यांनी संवादिनीसाथ केली. फारुखाबाद घराण्याचे दिग्गज तबलावादक पं अभिजित बॅनर्जी यांच्या एकल तबला वादनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांनी यावेळी फारुखाबाद घराण्याच्या पारंपारिक तबलावादनाची झलक उपस्थितांना दाखविली. यामध्ये त्यांनी ताल तीन ताल, वाजविण्यास कठीण असलेल्या धीर धीर रेला यांचे प्रभावी सादरीकरण केले. यानंतर त्यांनी आपले गुरु पद्म भूषण पं. ज्ञान प्रकाश घोष यांच्या रचनांची प्रस्तुती केली. बॅनर्जी यांना सुधीर टेकाळे (संवादिनी) आणि दीपिन दास (तबला) यांनी पूरक साथसंगत केली.
