पुणे कॅंटॉन्मेंट मतदारसंघात सुनील कांबळे यांचा पदयात्रेतून सामान्य नागरिकांशी संवाद
पुणे : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या 214 पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजप, महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजप उमेदवार आमदार सुनील ज्ञानदेव कांबळे यांनी सलग दुसऱ्या दिवशी पदयात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील सामान्य नागरिकांशी संवाद साधला.
आमदार सुनील कांबळे यांच्या आजच्या पदयात्रेचा प्रारंभ चूडामन तालिम येथून झाला, त्यानंतर पुना कॉलेज, काशेवाडी मार्गे भवानी माता मंदिर, भवानी पेठ येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका अर्चना पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक प्रदीप गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे शराध्यक्ष संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, माजी नगरसेवक अशोक कांबळे, तुषार पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), राष्ट्रीय समाज पक्ष, लहुजी शक्ती सेना, अखिल भारतीय मराठा महासंघ, युवा स्वाभिमान पक्ष, जनसुराज्य पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), भीमशक्ती, रयत क्रांती संघटना, जनता दल सेक्युलर, जय मल्हार क्रांती संघटना, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, दलित पँथर, भीमसेना, युवा सुराज्य संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, युवा रिपब्लिकन पार्टी, लहुजी साळवे बहुजन क्रांती आदी संघटना आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक देखील सहभागी झाले होते.
या प्रसंगी बोलताना सुनील कांबळे म्हणाले, कॅन्टोन्मेंट मतदार संघातील नागरिकांना विविध सोई, सुविधा उपलब्ध करुन देत असतानाच राज्यातील कष्टकरी, दुर्बल घटकातील नागरिक, विद्यार्थी, कामगार यांच्या न्याय मागण्यांबाबत विधानसभेत आवाज उठवता आला. काशेवाडी मध्ये असलेल्या समस्यांची मला कल्पना आहे. वीज आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्यात आम्हाला यश आले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी सोडविण्यास आमचा पुढील काळात प्राधान्यक्रम असणार आहे.
तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळी ताडीवाला रस्ता, ढोले पाटील रस्ता भागात पदयात्रा काढण्यात आली, या पदयात्रेलाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
