Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‘अस्मिता’सारखे उपक्रम खऱ्या अर्थाने दिलासा देतात –  सोनाली कुलकर्णी

पुणे : आज जसजशी लोकसंख्या वाढते आहे, तशा समस्या देखील वाढत आहेत. दररोज वर्तमानपत्रात महिलांचे शोषण, बलात्कार, महिलांसोबत झालेल्या चुकीच्या गोष्टी यांच्या बातम्या वाचून एक पालक म्हणून आपण सर्वजण एका अनिश्चित भीतीने ग्रासले आहोत याची जाणीव होते. अशा वेळी मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेला ‘अस्मिता’ उपक्रम हा खऱ्या अर्थाने आश्वस्त करणारा व दिलासा देणारा आहे, अशा भावना सुप्रसिद्ध अभिनेती सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. या उपक्रमामुळे आज महिला एकट्या नाहीत, त्यांच्या मदतीला अनेक संसाधने आहेत, त्या विश्वास ठेऊ शकतील असे अनेकजण त्यांच्या  आजूबाजूला आहेत याचा सुखद प्रत्यय येतो असेही त्यांनी नमूद केले.

रोटरीच्या बिबवेवाडी क्लब द्वारा जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधत ‘अस्मिता’ या कन्या सक्षमीकरण उपक्रमाच्या चौथ्या टप्पाची सुरुवात कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आली  त्या बोलत होत्या. खराडी येथील रॅडिसन ब्लू हॉटेल या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. जीटीपीएल संस्थेच्या सीएसआर विभागाच्या सहकार्याने २०१९ पासून हा उपक्रम सुरु असून याद्वारे आजवर ५ राज्यांतील तब्बल १ लाख मुलींना मदत करण्यात आली आहे.

कार्यक्रमा दरम्यान रोटरी बिबवेवाडीच्या वतीने यावर्षी ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक बी पी के (बॉब) शाह यांचा व्होकेशनल सेवा पुरस्कार प्रदान करीत गौरविण्यात आले. जीटीपीएल संस्थेच्या सीएसआर विभागाच्या संचालिका दिव्या मोमाया,  मुख्य वित्त अधिकारी सौरभ बॅनर्जी, डिस्ट्रीक्ट ३१३१ चे प्रांतपाल शीतल शाह, पुढील प्रांतपाल नितीन ढमाले, माजी प्रांतपाल मोहन पालेशा, पंकज शाह, बिबवेवाडी क्लबच्या अध्यक्षा मानसी शाह, अस्मिता प्रकल्पाचे समन्वयक डॉ जिग्नेश पंड्या, डॉ प्राची पंड्या, बिबवेवाडी क्लबचे भाविन देसाई, रीना सेठ, निखील भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना कुलकर्णी पुढे म्हणाल्या, “माझ्या पिढीला मानसिक आरोग्य हा शब्द इतकेच काय तर ही संकल्पना देखील माहित नव्हती. मात्र आजच्या पिढीला या समस्या आहेत याची माहिती आहे, त्यामुळे ही पिढी भाग्यवान आहे असे मला वाटते. शिवाय या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडे माहिती, साधने पाठबळ आहे, ते शिकत असलेल्या शाळेत आज समपुदेशक आहेत हा महत्त्वपूर्ण बदल आहे.”

मला लहानपणापासून कायम पाठीशी ठामपणे उभे राहणारे पालक, सुसंस्कृत भाऊ मिळाले. माझ्या प्रत्येक पावलावर सोबत करणारा नवरा मिळाला. आजूबाजूला चांगले मित्र, चित्रपट सृष्टीत काम करताना चांगले सहकलाकार, दिग्दर्शक मिळाले. या सर्वांनी कायमच मला सुरक्षित वातावरण दिले यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजते. शिवाय या क्षेत्रात माझ्या गुरुंनी कायम मला संवेदनशील राहत, नीतीमत्तेने अभिनय करायला शिकविले असल्याने पुरुष सहकलाकारांसोबत स्वत:ची तुलना न करता मी प्रामाणिकपणे काम करत गेले. त्यामुळे अनेक गोष्टींचा मला फरकच पडला नाही असे अनुभव सोनाली यांनी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडीच्या वतीने २०१९ साली हाती घेतलेल्या ‘अस्मिता’ या कन्या सक्षमीकरणाच्या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना मानसी शाह म्हणाल्या, “विद्यार्थीनींमध्ये मासिक पाळी, लैंगिक अत्याचार, स्वसंरक्षण, समाजमाध्यमांद्वारे होणारी गुंडगिरी, आर्थिक साक्षरता या विषयांसंदर्भात जागृती व्हावी या हेतूने मागील ५ वर्षांपासून आमच्या क्लबच्या वतीने अस्मिता हा उपक्रम राबविला जात आहे. आजवर किमान २०० ठिकाणी १ लाख विद्यार्थीनींपर्यंत पोहोचण्यात आम्हाला यश आले असून पुढील एका वर्षात आणखी ५० हजार विद्यार्थीनींपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. मानसिक आरोग्याचे महत्त्व लक्षात घेत ‘अस्मिता’ उपक्रमातील या चौथ्या टप्प्यात येत्या वर्षभराच्या काळात महाविद्यालयीन मुलींच्या मानसिक आरोग्यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत त्यांसाठी पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहोत.”

दिव्या मोमाया यांनी यावेळी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे गरजेचे असल्याचे सांगत कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांसमोर असलेल्या अनेक अडचणींबद्दल माहिती दिली. घरातील एक स्त्री शिकली तर कुटुंब शिकते मात्र, एक महिला जेव्हा व्यवसायात उतरते व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होते तेव्हा ती पुढची पिढी घडवीत असते, असेही त्यांनी नमूद केले.

बी पी के (बॉब) शाह यांनी यावेळी त्यांचा प्रवास आणि रोटरी सोबत जगभरात केलेल्या कामांची माहिती दिली. अहाना भालेराव यांनी प्रार्थना सादर करीत कार्यक्रमाला सुरुवात केली. मानसी शाह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ जिग्नेश पंड्या यांनी सूत्रसंचालन केले. भाविन देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading