Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

दिव्यांगांनी साकारलेल्या कलात्मक वस्तूंच्या ‘प्रोत्साहन’ प्रदर्शनाला प्रारंभ

पुणे : आकाशकंदील, भेट पाकिटे, कागदी फाईल्स, खाद्यपदार्थ, दागिने, वायरच्या बास्केट अशा दृष्टीहिन आणि दिव्यांग व्यक्तींनी साकारलेल्या कलात्मक वस्तूंच्या प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील २८ दिव्यांग व्यक्ती आणि १२ संस्थांचा सहभाग असलेल्या प्रोत्साहन प्रदर्शनात दिव्यांगांनी कलागुणांचे सादरीकरण देखील केले.

दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी व्हाव्या, तसेच समाजाला त्यांच्यातील कौशल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने पुण्यातील समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन प्रोत्साहन २०२४ या प्रदर्शनाचे आयोजन कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे केले आहे. दिव्यांगांसाठी ३५ वर्षे कार्यरत असलेल्या प्रिझम फाऊंडेशनच्या बेन्यू टेÑनिंग इन्स्टिटयूटच्या मुख्याध्यापिका विद्या भागवत आणि पीपल वीथ हीअरिंग इमपेअर्ड नेटवर्कच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा कर्णबधिर अंबु गोविंदगिरी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

प्रदर्शनाचे संयोजन रंजना आठल्ये, रेखा कानिटकर, आरती पटवर्धन, माधुरी पाटणकर, शुभदा करंदीकर, गीता पटवर्धन, आबेदा खान, नीलम भाटवडेकर, अमृता पटवर्धन, रोहिणी अभ्यंकर यांनी केले आहे. प्रदर्शनादरम्यान धायरी येथील दृष्टीहिन वृद्ध महिलांनी वायरचे बास्केट, मण्यांचे शोपीस तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. त्याशिवाय प्रदर्शन सुरु असताना दिव्यांग कलाकार करमणुकीचे कार्यक्रम देखील सादर करीत आहेत. तसेच विविध प्रात्यक्षिके देखील सुरु आहेत.

फक्त दिव्यांग व्यक्तिंचाच सहभाग असलेल्या या प्रदर्शनात त्यांनी साकारलेल्या उपयुक्त कलात्मक वस्तू आणि खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री केली जाते. त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. प्रदर्शनात विद्या ज्योती स्पेशल स्कूल, अंध वृद्ध महिलाश्रम, नंदनवन, प्रिझम फाउंडेशन, मैत्र फाउंडेशन, स्मित फाउंडेशन, उन्मेष संस्था इत्यादींनी भाग घेतला आहेत.

सन २००३ पासून हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते. प्रदर्शनात १८ ते ८० वयोगटातील दिव्यांग व्यक्ती सहभागी होतात. दिव्यांगाना सक्षम करणे हाच प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत हे प्रदर्शन विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading