Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिंदे गटाला अधिक जागा मिळाव्या – अर्जुन खोतकर

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुका महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाला अधिक जागा मिळाव्या किंवा समप्रमाणात जागावाटप व्हावे, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे. 

एकीकडे वरिष्ठ पातळीवर नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या चर्चा होत असताना दुसऱ्या फळीतील नेते कार्यकर्ते जागा वाटपाबाबत मागणी आणि विधाने करीत आहेत. अनेक वाचाळवीरांना समज देऊनही त्याचा काही उपयोग होत असलेला दिसत नाही. त्यामुळे महायुतीत सारे काही आलबेल नाही, असा संदेश दिला जात आहे. 

अशाच प्रकारे खोतकर यांनी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला अधिक जागा मिळाव्या किंवा समान जागावाटप करावे, अशी मागणी पत्रकारांशी बोलताना केली आहे. अर्थात जागा वाटपाबाबतचा निर्णय मी नव्हे तर वरिष्ठ नेते घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

… तर मैत्रीपूर्ण लढती अनिवार्य 

महायुतीत जागावाटपादरम्यान काही जागांवर सर्वच घटक पक्षांचा आग्रह असू शकतो. काही वेळा पक्ष कार्यकर्ते टिकवण्यासाठी एखाद्या जागेवर टोकाचा आग्रह करावा लागतो. अन्यथा नेते कार्यकर्ते इकडे तिकडे जाण्याची शक्यता असते. अशावेळी घटक पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती अनिवार्य असणार आहेत. यापूर्वी देखील अशा मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत, असे खोतकर यांनी नमूद केले. 

शिंदे गटाचा नवा कार्यक्रम 

निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून शिवसेना शिंदे गटाने एक नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत शिंदे गटाचे नेते किमान 15 घरात जाऊन महिलांशी चर्चा करणार आहेत. त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का, त्यामध्ये त्यांना कोणत्या अडचणी आल्या, याची माहिती महिलांकडून घेतली जाणार आहे. या कार्यक्रमाला ठाण्यात प्रारंभ झाला असून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 घरी जाऊन महिलांशी संवाद साधला आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत महिला मतदारांना आकृष्ट  करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading