दहा हजार कुशल कर्मचारी इस्रायलला रवाना केले जाणार
नवी दिल्ली: इस्राएल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्या देशात पायाभूत सुविधा उभारणी, बांधकाम आणि आरोग्य सेवा क्षेत्रात कुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दहा हजार कुशल कर्मचारी इस्रायलला रवाना केले जाणार आहेत.
इस्राएलला वेल्डिंग, प्लास्टिकिंग व टाइल्स चे काम करणाऱ्या कुशल कामगारांची गरज आहे. त्याचप्रमाणे शासनमान्य संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्य सेवेतील स्त्री व पुरुष परिचारकांची आवश्यकता आहे. भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेचा इस्राएलबरोबर कुशल कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी करार झाला आहे. त्यानुसार भारतात भरतीसाठी निवडीची पहिली फेरी उत्तर प्रदेश हरियाणा आणि तेलंगणा या राज्यात पूर्ण झाली असून दुसऱ्या फेरी महाराष्ट्रातील कुशल कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
या भरतीमध्ये निवडलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा एक लाख 92 हजार रुपये वेतन, 15 हजार 515 रुपये दरमहा बोनस, विमा संरक्षण, निवास व भोजन व्यवस्था अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना इस्रायली जीवनशैली व संस्कृती यांचा परिचय करून देणारे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
