Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

वारसा संवर्धन हे केवळ वस्तू नाही तर प्राचीन ज्ञानाचे संवर्धन – प्रतापआनंद झा

पुणे  : आपल्या प्राचीन संस्कृतीत तीन हजार, पाच हजार वर्षे जुने शिलालेख, हस्तलिखिते आढळतात. एखादी माहिती जेवढी जुनी तेवढे त्याचे महत्त्व जास्त असते आणि म्हणून वारसा संवर्धन हा कायमच महत्त्वाचा विषय राहिला आहे. त्यामुळे प्राचीन वारसा संवर्धन हे केवळ एखाद्या प्राचीन वस्तूचे संवर्धन नसून ते खऱ्या अर्थाने ज्ञानाचे जतन व संवर्धन आहे, असे मत इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (आयजीएनसीए)चे अधिष्ठाता प्रो प्रतापआनंद झा यांनी व्यक्त केले. प्रो झा यांच्या उपस्थितीत

आज भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेमध्ये प्रिव्हेंटिव्ह कन्झर्व्हेशन या विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले. त्यावेळी संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सच्या संवर्धन विभागाचे प्रमुख आचल पंड्या, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेचे सचिव सुधीर वैशंपायन व नियामक मंडळाचे उपाध्यक्ष प्रो प्रदीप आपटे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

आज आपल्या हातामधून आपले प्राचीन ज्ञान निसटत चालेल असून त्याचे योग्य पद्धतीने जतन करणे आणि ते काळानुसार ‘अपग्रेड’ ठेवणे गरजेचे असल्याचे मत प्रो. झा यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सच्या सहकार्याने  पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेत प्रिव्हेंटिव्ह कन्झर्व्हेशन या विषयावर पदव्युत्तर पदविका हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात प्राचीन वारसा संवर्धन व जतन हे शास्त्रीय व पारंपारिक पद्धतीने कसे करावे, याविषयी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार असून १ वर्ष इतका कालावधी असणाऱ्या पहिल्या बॅचसाठी १६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे आयजीएनसीएमध्ये चालणारा हा अभ्यासक्रम भांडारकर संस्थेकडे अधिक सविस्तरपणे शिकवला जाणार आहे.

भांडारकर संस्थेत मागील १० वर्षांत अनेक पातळीवर अनेकविध कामे झाली असून आम्हाला ते करता आले याचा आनंद आहे. या आधी संस्थेच्या वतीने कौटुंबिक वारसा संवर्धन संबंधीच्या कार्यशाळा झाल्या होत्या. त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर पदविका अभ्यासक्रम करण्यासंदर्भात आम्ही विचार सुरु केला. आज हा अभ्यासक्रम सुरु होत असताना आम्हाला विशेष आनंद होत असल्याचे सुधीर वैशंपायन यांनी सांगितले.

आज प्राचीन वारसा संवर्धन करीत असताना त्यासाठी वापरत असलेल्या रसायनांमुळे त्या वारशाचे नुकसान तर होणार नाही ना याची काळजी घेणे जास्त गरजेचे असते. ही मूळ बाब अधोरेखित करीत विद्यार्थ्यांना येथे वारसा संवर्धनाचे प्रशिक्षण दिले जाईल. येणाऱ्या काळात या प्रशिक्षणाची पुढची पायरी असलेले रेमेडियल कन्झर्व्हेशनवर देखील शिकविण्याचा आमचा मानस आहे, असे पंड्या यांनी सांगितले. नवी दिल्ली येथील आयजीएनसीएच्या माध्यमातून आजवर प्रिव्हेंटिव्ह कन्झर्व्हेशन पदव्युत्तर पदविकेच्या पाच बॅचेस बाहेर पडल्या असून त्या सर्वांना संबंधित क्षेत्रात नोकरी / रोजगार मिळाली आहे. हाच अभ्यासक्रम आता बोरीच्या माध्यमातून पुण्यात राबविण्यात येणार असून भांडारकर संस्थेच्या  जतन व संवर्धन या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदाही विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास पंड्या यांनी व्यक्त केला.

आज देशात किमान १०० वर्षे जुन्या अनेक संस्था, ग्रंथालये असून त्यांची स्वत:ची जुनी कागदपत्रे (रेकॉर्ड्स) जतन करणे हे एक मोठे आव्हान तसेच या विद्यार्थ्यांसाठी संधी देखील आहेत. त्यामुळे वारसा संवर्धनाचे कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना नजीकच्या भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असणार आहेत अशी माहितीही प्रो आपटे यांनी दिली.

भांडारकार संस्थेच्या सहनिबंधक स्नेहा सप्रे यांनी उपस्थितांचे स्वागत करीत सूत्रसंचालन केले. तर संस्थेच्या संवर्धन विभागाच्या प्रमुख वर्षा कोटफोडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading