Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

नोबल हॉस्पिटल येथील डॉक्टरांच्या टीमला तरुण आयटी व्यावसायिकाची दृष्टी वाचविण्यात यश

पुणे  : रामटेकडी परिसरातील एका मद्यधुंद व्यक्तीने भिरकावलेल्या दगडामुळे  २६ वर्षीय महिला आयटी व्यावसायिकाच्या डोळ्याच्या बाजूला झालेल्या गंभीर दुखापतीवर नोबल हॉस्पिटल येथील डॉक्टरांच्या टीमला बहुआयामी प्रयत्नांनी दृष्टी वाचविण्यात यश मिळाले.

तिच्या डोळ्याजवळचे हाड तुटले होते. डोळ्याने दिसत नव्हते. अशा स्थितीत रुग्णाला उपचारासाठी नोबल  हॉस्पिटल मध्ये  आणले. रुग्णालयातील कान, नाक, घसा (ईएनटी) तज्ज्ञ डॉ. सुधीर हलिकर, प्लास्टिक सर्जन डॉ. रवी स्वामिनाथन आणि डॉ.मनोज पवार आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. सचिन बोधले यांनी या रुग्णावर सांघिक उपचार केले. त्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यात तिच्यावर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने त्याचा पाठपुरावा करण्यात आला.

नोबेल  हॉस्पिटल मधील  प्लास्टिक सर्जन डॉ. रवी स्वामिनाथन म्हणाले, “साधारणपणे सहा महिन्यांपूर्वीची ही घटना आहे. ती दुचाकीवर मागे बसली होती. त्यावेळी दगड लागल्याने तिच्या डोळ्याजवळ गंभीर इजा झाली. ही तरुण मुलगी जेव्हा  रुग्णालयात आली तेव्हा तिच्या डोळ्यांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. तिच्या चेहऱ्याचे हाडही तुटले होते. त्याचा थेट परिणाम डोळ्यांकडून मेंदूकडे संवेदना पोचविणाऱ्या नसांवर (ऑप्टिक नर्व्ह)  झाला होता. त्यामुळे  या  तरुण मुलीची दृष्टीही गेली होती. चेहऱ्यावरच्या गंभीर जखमांमुळे गुंतागुंत वाढली होती. पण, उपचाराचा प्राधान्यक्रम ठरविताना तिची दृष्टी वाचण्याला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले. त्यामुळे त्या पद्धतीने उपचाराचे नियोजन केले गेले.

नोबेल  हॉस्पिटल मधील  ‘ईएनटी’ तज्ज्ञ डॉ. सुधीर हलिकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘एंडोस्कोपिक ऑप्टिक नर्व्ह डिकंप्रेशन’ प्रक्रिया केली. या बद्दल माहिती देताना डॉ. सुधीर हलिकर म्हणाले, “ही प्रक्रिया रुग्णाला पूर्ण भूल देऊन केली जाते. या उपचाराचे दोन टप्पे होते. पहिला म्हणजे, इतर  साधनांसह एंडोस्कोपचा डोळे आणि मेंदूच्या नसांच्या मागे असलेल्या पोकळी (सायनस) खुली करण्यात आली. त्यात यश मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात, फनेलच्या आकाराच्या असलेल्या ऑप्टिक कॅनालवरील हाडाचा भाग काढण्यात आला. त्यातून नसावरील (ऑप्टिक नर्व्ह) ताण कमी झाला”

“मानवी डोळ्यांची रचना समजून घेणे महत्वाचे आहे. ऑप्टिक नर्व्ह ही मेंदूपासून कवटीमधून डोळ्यापर्यंत विस्तारलेली असते. या नसाचा एक भाग कवटीमधील कठोर हाडांच्या भागातही असतो.  एखादी गंभीर जखम, अपघात किंवा त्या जागेत वाढलेल्या गाठीमुळे ऑप्टिक नर्व्हवरचा दाब वाढतो. त्यातून रुग्णाची दृष्टी जाण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ऑप्टिक नर्व्हवरील दाब कमी करणे महत्त्वाचे असते. ‘एंडोस्कोपिक ऑप्टिक नर्व्ह डिकंप्रेशन’ च्या माध्यमातून कान, नाक, घसा तज्ज्ञ ही कमीत कमी छेद असलेली  प्रक्रिया करतात.

डॉ. स्वामीनाथन पुढे म्हणाले, “रुग्णाची दृष्टी वाचविण्यासाठी ऑप्टिक नर्व्हवरचा दाब कमी करण्यात यश आले. मात्र, उपचार येथे संपले नव्हते. पहिल्या टप्प्यात आधार देणारे हाड कापून टाकण्यात आले होते, मात्र या नेत्र कक्षामध्ये (ऑर्बिटल ग्लोब) आधाराची गरज असते आणि पुन्हा हाडांचा वापर केला तर दाब वाढला असता. त्यामुळे टायटॅनियम प्लेटचा वापर करून हा आधार देण्यात आला.

प्लास्टिक सर्जन डॉ. मनोज पवार म्हणाले, “डोळ्याच्या कक्षाची रचना पुनर्संचयित करणे महत्वाचे होते. अगदी सोप्या भाषेत दोन्ही डोळ्यांना समान पातळीवर आणण्यात आले ज्यामुळे दुहेरी दृष्टीचा धोका कमी झाला.

ही तरुण मुलगी ऑगस्टमध्ये पुन्हा पाठपुराव्यासाठी आली. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील जखमा जवळपास पूर्ण बऱ्या झाल्या होत्या.

नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,सांघिक कार्य व रूग्णांप्रती समर्पितता,टीम मधील एकमेकांप्रती समर्पिततेमुळे रूग्णांना सर्वोत्कृष्ट परिणाम मिळू शकतात.या अवघड परिस्थितीवर मात करणाऱ्या आमच्या टीमचे अभिनंदन.


नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की,सर्वोत्कृष्ट तज्ञ आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर सर्वोत्कृष्ट रूग्णसेवा प्रदान करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.बहुआयामी सांघिक कार्यामुळे रूग्णांना सर्वोत्कृष्ट परिणाम मिळू शकतात हे या तरूण आयटी व्यावसायिकावर झालेल्या यशस्वी उपचारामधून स्पष्ट होते.या मुलीची दृष्टी वाचली असून पुन्हा नव्या जोमाने ती आपल्या आयुष्यातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यरत होईल याचा आम्हाला आनंद आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading