Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ‘दळवी समजून घेताना..’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे  : ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष ऑगस्ट महिन्यापासून सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बेलवलकर सांस्कृतिक मंचाच्या वतीने गुरुवार दि १५ ऑगस्ट रोजी ‘दळवी समजून घेताना..’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पेठेतील एस एम जोशी सभागृह या ठिकाणी सायंकाळी ५ वाजता सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल. काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

कार्यक्रमा संदर्भात अधिक माहिती देताना बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे प्रमुख समीर बेलवलकर म्हणाले, “१४ ऑगस्ट पासून ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे. या निमित्ताने या महान सरस्वती उपासकाला मानाचा मुजरा करण्यासाठी आम्ही सदर कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत.”

कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, ज्येष्ठ नाटककार प्रशांत दळवी आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी या जयवंत दळवी यांच्या व्यक्तीमत्त्वावर प्रकाश टाकतील. बेलवलकर सांस्कृतिक मंचाच्या वतीने खास तयार करण्यात आलेल्या जयवंत दळवी विशेषांकाचे प्रकाशन देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल, अशी माहितीही समीर बेलवलकर यांनी कळविली आहे.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संभाषा फाउंडेशन प्रस्तुत ‘स्त्रीपर्व’ हा कार्यक्रम संपन्न होईल. यामध्ये जयवंत दळवी यांच्या गाजलेल्या नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखांवर आधारित नाट्यप्रवेशांचे अभिवाचन करण्यात येईल. या कार्यक्रमाची संकल्पना मानसी मागीकर यांची असून विनीता पिंपळखरे, अमित त्रिभुवन आणि मानसी मागीकर हे कलाकार कार्यक्रम सादर करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading