लोकमान्य आणि लोकशाहीरांना रंगावली व दिव्यांतून अभिवादन
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे २० बाय २० फूट आकारातील भव्य रंगावली
पुणे : भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि मराठी साहित्य क्रांतीचे उर्जास्त्रोत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना रंगावली व दिव्यांतून अभिवादन करण्यात आले. लोकमान्य आणि लोकशाहीरांनी केलेल्या अलौकिक कार्याचे स्मरण शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सामान्यांना देखील व्हावे, याकरिता भव्य रंगावली रेखाटून महापुरुषांचे कार्य यामध्ये दाखविण्यात आले.

जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्, न-हे तर्फे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सांगणारी ही रंगावली २० बाय २० फूट आकारामध्ये साकारण्यात आली. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटस्चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, सुरेखा जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. रंगावलीकार सुनील सोनटक्के आणि वैशाली सोनटक्के यांनी तीन तासांमध्ये ही रंगावली साकारली.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणा-या लोकमान्य टिळकांना आणि फकिरा सारख्या साहित्यकृतीतून लोकजागृती करणा-या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली. तसेच या व्यक्तिमत्वांचे स्मरण करुन त्यांच्याप्रमाणे कार्य करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
