योजना लाडक्या भावा- बहिणींसाठी नाही तर लाडक्या खुर्चीसाठी – विजय वडेट्टीवार
मुंबई: महायुती सरकारने घोषणा केलेल्या मुख्यमंत्री लाडका भाऊ, बहीण आणि इतर योजना लाडक्या भावा- बहिणींसाठी नाही तर लाडक्या खुर्चीसाठी असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. योजनांच्या प्रसिद्धीच्या नावाखाली महायुतीकडून सरकारी तिजोरीतून स्वतःची प्रसिद्धी करून घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना या निवडणुकीच्या प्रचाराचा खर्च सरकारी तिजोरीतून भागविण्याची तरतूद सरकारने करून ठेवली आहे. सरकारी योजनांच्या प्रचार प्रसाराच्या नावाखाली एक, दोन कोटी नव्हे तर तब्बल २७० कोटीचा खर्च केला जाणार आहे. प्रत्यक्षात तो महायुतीच्या प्रचारासाठी असणार आहे, असा वडेट्टीवार यांचा आरोप आहे.
जनतेच्या भल्यासाठी विविध योजना आखणे आणि त्याची अंमबजावणी करणे हे कोणत्याही कल्याणकारी राज्याच्या सरकारची जबाबदारीच असते. मात्र, महायुती सरकारने जाहीर केलेल्या घोषणांचा जनतेला प्रत्यक्षात किती लाभ मिळणार, हा संशोधनाचा विषय आहे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमांद्वारे सरकारवर ही टीका केली आहे. त्याबरोबरच त्यांनी या खरचासाठीचा शासन निर्णयही (जीआर) प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, तीर्थक्षेत्र योजना अशा योजनांच्या प्रचार, प्रसारासाठी माहिती व जनसंपर्क विभागाला २७० कोटी ५ लाख रुपये उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे.
