भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्याचा निर्धार निश्चितपणे पूर्ण केला जाईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारताची आर्थिक प्रगतीकडे दमदार वाटचाल सुरू आहे. देश आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आपण पंतप्रधान म्हणून तिसरा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्याचा निर्धार केला असून तो निश्चितपणे पूर्ण केला जाईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) वतीने आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात मोदी बोलत होते. या अधिवेशनाला देशभरातील विविध उद्योग, आर्थिक, व्यावसायिक व उद्योग विचार मंच, राजकीय संस्था संघटना यांचे एक हजाराहून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्र यांच्यात संवाद आणि समन्वय निर्माण करून विकासाला गती देण्याच्या उद्देशाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘त्यांच्या’पेक्षा मी आहे जरा वेगळा
मी जरी राजकारणाच्या क्षेत्रात असलो तरी इतर राजकारण्यपेक्षा मी जरा वेगळा आहे. आम्हा राजकारण्यांपैकी बहुतेक जण एकदा निवडणुका होऊन गेल्या की निवडणुकीपूर्वी आपण काय बोललो होतो, हे साफ विसरून जातात. मात्र, त्यांच्यामध्ये मी एक अपवाद आहे. मी निवडणुकीच्या आधी काय बोललो ते लक्षातही ठेवतो आणि प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नही करतो, असा दावा मोदी यांनी केला.
आव्हान ते सुसंधी असा आर्थिक प्रवास
देशाने सर्वप्रथम 2014 मध्ये मला पंतप्रधान म्हणून सेवा करण्याची संधी दिली. त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर कशी आणायची, हे मोठे आव्हान देशासमोर आणि सरकार समोर होते. आता आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेला भारत सर्व क्षेत्रांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून देत आहे. सरकारने विविध मंत्रालयांना दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये विक्रमी वाढ केली आहे. सरकारच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीचा वेग अभूतपूर्व आहे. मागच्या सरकारच्या तुलनेत आमच्या सरकारने महामार्ग बांधणी आणि रेल्वे विस्तारीकरणासाठी आठ पट अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. कृषी क्षेत्राच्या निधीमध्ये चौपट वाढ झाली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी दुप्पट अधिक निधी देण्यात आला आहे.
