Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

वेदना विरहित जीवनासाठी ‘हॅन्ड सर्जरी’ ठरतेय वरदान : डॉ. पंकज जिंदल

पुणे: “हाताचा वाकडेपणा, भाजलेले व जळालेले हात, जन्मजात विकृती, लहान मुलांच्या हातांमधील व्यंग, हाताला लकवा, चिकटलेली बोटे यामुळे आयुष्यात शारीरिक व सामाजिक वेदनांचा सामना करावा लागतो. अशा शारीरिक व्यंगावर मात करून वेदना विरहित जीवन जगण्यासाठी ‘हॅन्ड सर्जरी’ वरदान ठरत आहे,” असे प्रतिपादन जगप्रसिद्ध हॅन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदल यांनी केले.
हॅन्ड सर्जरी इंडिया आणि इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भांडारकर इन्स्टिट्यूट येथे ‘हाताच्या शस्त्रक्रिया’ यावर आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत डॉ. पंकज जिंदल बोलत होते. या परिषदेत महाराष्ट्र, आसाम, जम्मू व काश्मीरसहित देशभरातील हॅन्ड सर्जरी करणारे डॉक्टर सहभागी झाले होते. तीन दिवसांच्या या परिषदेत ८० पेक्षा अधिक विषयांवर सचित्र सादरीकरणासह चर्चा झाली.
डॉ. पंकज जिंदल यांनी परिषदेचे महत्व सर्वांना पटवून देत विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले. पहिल्या दिवसाच्या सत्रात हातांच्या दुखापती आणि त्यांचे व्यवस्थापन यांवर चर्चा झाली. रुग्णाला वेदना विरहित जीवन देण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना व आधुनिक उपचार यांविषयी डॉ. जिंदल यांनी सांगितले.
“हॅन्ड सर्जरी क्षेत्रातील त्रुटी दूर करून रुग्णांना सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्त करण्यासाठीच्या उपचार पद्धती उदयोन्मुख शल्यचिकित्सकांना कळाव्यात, त्यादृष्टीने यावर चर्चा व्हावी, हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. हाताच्या दुखापतींचे व्यवस्थापन, वाकडेपणा, हाताला मुंग्या येणे, अर्धांगवायू, जळालेले व भाजलेले हात, त्यावरील शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर्समधील गुंतागुंत, अपघातांमुळे झालेल्या विकृती, अंगठ्यांची पुनर्स्थापना, हाताच्या कॉन्ट्रॅक्चर्स (कठीणपणा) यांचे निराकरण आणि कापलेल्या अंगठ्यांची पुनर्निर्मिती आदींवर चर्चा झाली. हॅन्ड सर्जरी तज्ज्ञांकडून शिकण्याची, त्यांच्या अनुभवांचे आदान-प्रदान करण्याची आणि हॅन्ड सर्जरीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी या परिषदेत सहभागी डॉक्टरांना मिळाली,” असे डॉ. पंकज जिंदल यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading