Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‘औषधी वनस्पतींची प्रक्रिया व मूल्यवर्धन’ विषयी दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागांतर्गत असलेल्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह- सुविधा केंद्र येथे दिनांक २७ व २८ जुलै, २०२४ रोजी “औषधी वनस्पतींची प्रक्रिया आणि मूल्यवर्धन” या विषयावर दोन दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन विद्यापीठाचे मा. प्र-कुलगुरू, प्रा. (डॉ.) पराग काळकर यांच्या हस्ते झाले.

डॉ. पराग काळकर यांनी आधुनिक शेती, मूल्यवर्धन, शेतीसाठी निर्माण करण्यात आलेली विकसित कौशल्ये व त्या आधारित संशोधन, बाजारपेठ साखळी इ. विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी बदलत्या हवामानात औषधी वनस्पतींचा समावेश परंपरागत शेतीमध्ये करून औषधी वनस्पती क्षेत्रातील संधींचा फायदा घेण्याचे आवाहन उपस्थित प्रशिक्षणार्थीना केले.

प्रा. (डॉ.) ए. बी. नदाफ, विभागप्रमुख वनस्पतीशास्त्र विभाग, यांनी उपस्थितांचे स्वागत करून वनस्पतीशास्त्र विभाग व औषधी वनस्पती केंद्राविषयीची माहिती उपस्थितांना दिली. केंद्राचे प्रमुख संशोधक व विभागीय संचालक प्रा. (डॉ.) दिगंबर मोकाट यांनी प्रशिक्षणाचे प्रास्ताविक करून “औषधी वनस्पती संपदा व राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या योजना” याविषयी पहिल्या सत्रात माहिती दिली. प्रा. (डॉ.) ए. बी. अडे, पूर्व विभागप्रमुख व समन्वयक यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रशिक्षणात २५ प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला.

दोन दिवशीय प्रशिक्षणात विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. बाळासाहेब कुरकुटे, डॉ. अपूर्वा संगोराम, डॉ. योगेश प्रभुणे, डॉ. श्रीपाद महामुनी, डॉ. स्वप्नील शिंदे,  मंदार कार्लेकर,  शिरीष जगताप,  निशिकांत जाधव यांनी औषधी वनस्पती लागवड, काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्राथमिक प्रसंस्करण या विषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये चूर्ण, औषधी निर्माण, सुगंधी तेले, सौंदर्य प्रसादने (फेस क्रीम, साबण) कल्प, चॉकलेट, बिस्किट, हर्बल जूस, हर्बल चहा, औषधी अन्नपदार्थ, जनावरांचे औषधी खाद्य इ.साठी प्रक्रियेविषयी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण घेतले.  श्रुती गावडे,  काजल पोकळे,  संध्या देवरे, डॉ. टी. डी. खरात,  गुलाब भाला व  गणेश शेकडे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात मदत व समन्वयकाचे काम केले. प्रशिक्षणावेळी उपस्थितांना प्रयोगशाळा, संग्रहालय, औषधी वनस्पती उद्यान दाखविण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading