Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन

 

पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येत असून नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करण्याची पात्र नागरिकांना संधी आहे.

आकुर्डी येथील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालय आणि निगडी येथील डॉ.डी.वाय.पाटील महाविद्यालयात मतदार नोंदणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी आणि मतदानाच्या महत्वाविषयी माहिती देण्यात आली. चिंचवड येथील कै.नागनाथ मारुती गडसिंग (गुरुजी) कनिष्ठ महाविद्यालयातही विशेष मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले.

भोर, सावित्रीबाई फुले कन्या शाळा सासवड, विश्रांतवाडी येथील पंचशील नगर, टिंगरे नगर येथील सरस्वती विद्यालय, मगरपट्टा, थेरगाव रुग्णालय, वेल्हे येथील जिल्हा परिषद शाळा, मुळशी येथील प्लॅटटिनम पार्क, आंबेगाव, खेड,आळंदी, मुळशी, आंबेगाव, चांडोली खुर्द, अवसारी खुर्द, भोसरी आदी विविध ठिकाणी मतदार नोंदणीचे अर्ज भरून घेण्यात आले.

मतदारांना विशेष मोहिमेची माहिती देण्यासाठी ‘स्वीप’ अंतर्गत विविध जनजागृती उपक्रमदेखील राबविण्यात येत आहेत. विशेषत: नवमतदारांना मतदार नोंदणीसाठी आवाहन करण्यात येत आहे. मतदार नोंदणीसोबत मतदार यादीतील तपशिलात दुरूस्ती करण्यासाठीदेखील शिबिरात अर्ज स्विकारण्यात येत आहेत. मतदार यादीत नाव नसल्यास किंवा तपशीलात बदल करायचा असल्यास नागरिकांनी या विशेष शिबिरात सहभाग घ्यावा किंवा जवळच्या मतदान केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading