मुख्यमंत्री लाडकी बहीण : योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांचे आजितदादांनी कान टोचले
मुंबई: आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी खर्च करण्याची तयारी असून, या अर्थसंकल्पातच या योजनेसाठी 35 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले असल्याची ग्वाही देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त व अन्य संबंधित विभागांची संमती घेऊन मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतरच या योजनेची घोषणा करण्यात आली आहे, असे सांगून योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांचे कान टोचले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्यभरातील महिलांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. असे असताना विरोधकांकडून ही योजना केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आली असून ही जनतेच्या डोळ्यात त धुळ फेकणारी असल्याचे आरोप होत आहेत. त्यातच वित्त व नियोजन विभागाकडून या योजनेला विरोध असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोप आणि टीकेला खास दादा शैलीत उत्तर दिले आहे.
मी राज्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मी स्वतः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. ही योजना सादर करण्यापूर्वी वित्त व नियोजन आणि संबंधित सर्व विभागांकडून या योजनेला मान्यता घेण्यात आली आहे. या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात लागणाऱ्या निधीचे नियोजन या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेला पैसे कुठून आणणार असा सवाल करणे आणि या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याचा समज पसरविणे निरर्थक असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याचा प्रसिद्ध झालेल्या बातम्या बिनबुडाच्या वस्तुस्थितीशी विपरीत राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका पवार यांनी केली आहे. माध्यमांनी देखील अशा प्रकारची वृत्त प्रकाशित करू नये, असे आवाहन करताना पवार यांनी या बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही, अशी खात्री ही व्यक्त केली आहे.
