Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

वारकरी संगीत महाराष्ट्राची आद्य संगीत परंपरा – पं. यादवराज फड


पुणे : वारकरी संप्रदाय आणि वारकरी संगीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महाराष्ट्राच्या मराठी मातीची आद्य संगीत परंपरा म्हणून वारकरी संगीत परंपरेकडे पहावे लागते. 800 वर्षांची पार्श्वभूमी लाभलेल्या या संगीत परंपरेत काकडारती, गाथा भजन, संगीत भजन, कीर्तन, भारूड, वाटचालीचे भजन आणि जागर हे मुख्य संगीत प्रकार येतात आणि त्या प्रत्येकाचे वैशिष्ट्य स्वतंत्र आहे, असे विचार पं. यादवराज फड यांनी व्यक्त केले.
गानवर्धन आणि व्हायोलिन अकादमीचे स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुक्तसंगीत चर्चासत्रात ‌‘वारकरी संप्रदाय संगीत परंपरा‌’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना पं. फड यांचे सप्रात्यक्षिक व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.

गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, स्वरझंकार ज्ञानपीठाचे प्रमुख, प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे मंचावर होते.
वारकरी संगीत ही आदर्श संगीत परंपरा आहे, असे नमूद करून पं. फड म्हणाले, ओवीतून अभंग विकसित झाला तसे ओवी गायनातून अभंग गायन विकसित झाले आहे. पंचपदी आणि अभंगाचे धृपद गाणे हे वारकरी संगीत परंपरेचे मुख्य लक्षण आहे. अभंग गायन हेच परंपरेचे मुख्य अंग आहे. ही संगीत परंपरा सर्व संतांनी पांडुरंगाच्या उपासनेसाठी निर्माण केली असल्याने, या परंपरेला आचार संहिता आहे.
या वेळी पं. यादवराज फड यांनी पंचपदीचे गायन केले. त्याचप्रमाणे ‌‘हेची दान देगा देवा‌’, ‌‘चुरा चुरा कर माखन खाया‌’ तसेच ‌‘वृंदावनी वेणू‌’ आणि ‌‘कवणाचा माय वाजे‌’ या दोन गौळणी सादर केल्या. ‌‘कृपाळू सज्जन तुम्ही संत जन‌’ या भैरवीतील रचनेने चर्चासत्राची सांगता केली. त्यांना अविनाश पाटील (तबला), संजय गोगटे (हार्मोनियम), आसाराम साबळे (मृदंग), माऊली टाकळकर (टाळ) यांनी समर्पक साथसंगत केली.
गानवर्धन संस्थेचे संस्थापक कृ. गो. धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव करून पं. अतुलकुमार उपाध्ये म्हणाले, सांगीतिक क्षेत्रात धर्माधिकारी यांनी मोठे काम उभे केले आहे. तरुण वयात धर्माधिकारी यांच्यामुळेच स्वरमंच उपलब्ध झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.
संस्थेच्या उपक्रात सहकार्य करणारे मुकुंद जोशी तसेच पांडुरंग मुखडे यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.
सुरुवातीस दयानंद घोटकर यांनी गानवर्धन संस्थेच्या उपक्रमांची माहिती सांगत मुक्त संगीत चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कलाकाराचा सत्कार संस्थेच्या माजी विश्वस्त सानिया पाटणकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या विश्वस्त वासंती ब्रह्मे यांनी केले.
चर्चासत्रात शनिवारी (दि. 27) सुप्रसिद्ध ज्येष्ठ नृत्यगुरू विदुषी शभा भाटे या ‌‘कथक नृत्य परंपरा‌’ या विषयावर प्रात्यक्षिकांसह व्याख्यान देणार आहेत. यात अमिरा पाटणकर, अवनी गद्रे आणि शिष्यवर्गाचा सहभाग असणार आहे. तसेच गानवर्धन संस्थेतर्फे नवोन्मेष कथक नृत्य युवा कलाकार पुरस्कारासाठी रेणुका टिकारे-केळकर यांची तर शास्त्रीय संगीतामधील नवोन्मेष संगतकार पुरस्कारासाठी तबला आणि सारंगीवादक मंदार बगाडे यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारांचे वितरणही या वेळी होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading