प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे पुण्यात जलप्रलय – मुरलीधर मोहोळ
पुणे : शहरातील जनजीवन विस्कळीत करून टाकणाऱ्या जलप्रलयाला राज्याचा जलसंपदा विभाग आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. पूरस्थिती आणि बचाव कार्य आटोक्यात आल्यानंतर त्याच्या कारणांची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
केवळ एका रात्रीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पुराचा विळखा पडला आणि अनेकांचे घर संसार पाण्यात वाहून गेले. विशेषतः नदी लगतच्या भिलारेवाडी आणि सिंहगड रस्ता या परिसराला पुराचा मोठा फटका बसला. वास्तविक दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात शहरात कमी जास्त प्रमाणात पूर येत असतो. त्यासाठी पात्रालगतच्या नागरिकांचे स्थलांतरही करण्यात येते. मात्र, यावर्षी अल्पावधीत अधिक गंभीर स्वरूपाची पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याची कारणे आणि उपाय यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.
खोटे कथित पसरवू नका
यावर्षी उद्भवलेल्या पुरस्थितीनंतर नदीपात्रातील विकासकामे पुराला कारणीभूत ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. नदी सुधार प्रकल्प हा नेहमीच केवळ राजकीय विरोधकांच्याच नव्हे तर काही पर्यावरणवाद्यांच्या टीकेचा मुद्दा ठरला आहे. आता त्यात मेट्रोच्या बांधकामांची भर पडली आहे. मात्र, अशी टीका करणाऱ्यांचा ज्येष्ठ मंत्री आणि पुण्याचे.माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. नदी सुधार प्रकल्पावर उठ सूट टीका करू नका. अभ्यासकांनी या प्रकल्पाचा अभ्यास करावा. त्यात काही त्रुट असतील तर त्या निदर्शनास आणाव्या. उगीच त्याबद्दल खोटे कथित पसरवू नये, असे पाटील म्हणाले.
वास्तविक, नदीपात्रातील बांधकामे, विकास कामे करताना घेण्याची काळजी याबाबत प्रशासनाकडून कानाडोळा झाल्याचा आक्षेप मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनीही घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील सिमेंटचे रस्ते आणि पेवर ब्लॉक यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास वाव नसल्यामुळे पुरचा धोका वाढला असल्याकडे लक्ष वेधले आहे.
