Monday, June 8, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

पाकिस्तानचा दहशतवाद्यांना पाठिंबा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताच्या विरोधात जेव्हा जेव्हा दु:साहस करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा तो त्यांच्या अंगाशी आला आहे. मात्र, पाकिस्तान इतिहासापासून कोणताही धडा घेण्यास तयार नाही. दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्यामुळे मोठे नुकसान होऊनही पाकिस्तान त्यापासून परावृत्त  होत नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी कारगिल युद्ध स्मारक येथे कारगिल युद्धातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली. या युद्धातील शहिदांचा त्याग आणि बलिदान कधीही विस्मरणात जाणार नाही. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने ते कायम भारतीयांच्या स्मरणात राहील, असे कृतज्ञ उद्गार मोदी यांनी काढले.

भारताने केवळ कारगिलचे युद्धच जिंकले नाही तर आपल्या अतुलनीय सत्य, शक्ती आणि संयमाचे प्रदर्शन जगाला घडविले. वास्तविक भारत कडून त्या काळात पाकिस्तानबरोबर शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र, पाकिस्तानने आपला विश्वासघातकी चेहरा वर काढला. अर्थात, सत्यासमोर असत्याचा आणि संयमासमोर दहशतवादाचा सपशेल पराभव झाला.

अशा अनेक अनुभवातूनही पाकिस्तानने काहीही शिकवण घेतलेली नाही. दहशतवादाला पाठिंबा आणि छुपे युद्ध या माध्यमातून भारतात अशांतता प्रस्थापित करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र, आमचे शूर जवान त्यांच्या कोणत्याही प्रयत्नांना यश मिळू देणार नाहीत. जम्मू असं वा लद्दाख, आम्ही दहशतवादाचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading