भाजपच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या शिलेदाराने ठोकला शड्डू
पुणे : सध्या पुणे शहरातील कोथरूड भाजपचा बालेकिल्ला आहे. याच कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी दंड थोपटले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांपर्यंत आपण आपल्या भावना पोहचविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
कोथरूड हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असे. मधल्या काही काळात इतर पक्षाच्या प्रतिनिधींनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असले तरी आता पुन्हा जनमत शिवसेनेकडे आकृष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. ही विधानसभा निवडणूक लढवावी ही केवळ आपली व्यक्तिगत इच्छाच नाही तर मतदारसंघातील बहुसंख्या मतदारांचीही हीच इच्छा आहे. जनमताच्या रेट्यामुळेच आपण ही निवडणूक लढवावी यासाठी प्रेरित झालो आहोत, असा दावा सुतार यांनी केला.
सुतार परिवार आणि कोथरूड यांच्यात भावनिक नाते आहे. आपले पिता शशिकांत सुतार यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर दोन वेळा त्यांनी कोथरूड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. आपणही याच भागात नगरसेवक म्हणून कार्यरत आहोत. या परिसरातील नागरिकांची अधिकाधिक सेवा करण्यासाठीच विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे सुतार यांनी नमूद केले.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्याची आपली इच्छा आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि आघाडीतील अन्य घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे व्यक्त केली आहे. याबाबतीत पक्ष योग्य तो निर्णय घेईल. पक्षाच्या आदेशाचे आपण तंतोतंत पालन करू, असेही सुतार यांनी सांगितले.
