Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मनसे विधानसभा निवडणुकीत अडीचशे जागा लढवणार – राज ठाकरे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला, पर्यायाने महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत सव्वादोनशे ते अडीचशे जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ही घोषणा केली.

पक्षाच्या पाच निरीक्षकांचे पथक राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात भेट देऊन मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघाची माहिती आणि मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचे आपले आकलन या पदाधिकाऱ्यांना कथन करावे. इच्छुकांनी दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यात येणार आहे. निवडणूक लढविण्याची प्रबळ इच्छा असलेल्या आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच पक्षाकडून उमेदवारी देण्यात येईल, असे ही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आपण पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन एक ऑगस्ट पासून राज्यव्यापी दौरा करणार आहोत. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागावे. या निवडणुकीत आपल्या पक्षाचे काही लोक तरी मला सत्तेत पाठवायचे आहेत. काही जणांना हे हास्यस्पद वाटेल. मात्र, हे घडून येणारच, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. युती, आघाडी होणार का याचे विचार न करता निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading