केजरीवाल यांच्या प्रकृतीची हेळसांड करीत असल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शने
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांची कारागृहात हत्या करण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. केजरीवाल यांच्या प्रकृतीची हेळसांड करीत असल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शनेही करण्यात येणार आहेत.
कथित मध्य घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली. मात्र, याच घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केजरीवाल यांना अटक केली असून ते तिहार जेलमध्ये आहेत. त्यांना 8 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत.
केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी 3 जून ते 7 जुलै या कालावधीत तब्बल 26 वेळा धोकादायक रित्या कमी झाल्याचा दावा आम आदमी पक्षाने केजरीवाल यांच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे केला आहे. केजरीवाल यांचा कारागृहात बळी घेण्याचा भाजपचा डाव आहे, असा त्यांचा आरोप आहे.
केजरीवाल यांच्या प्रकृतीची हेळसांड करीत असल्याचा आरोप करून विरोधकांची इंडिया आघाडी ३० जुलै रोजी जंतर-मंतर येथे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनेही करणार आहे.
