पंतप्रधानांना गप्प करण्याचा प्रयत्न तब्बल अडीच तास करणे हे लोकशाही तत्वात बसणारे नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील पंतप्रधानांच्या आभारदर्शक भाषणाच्या वेळी विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. पंतप्रधानांना गप्प करण्याचा प्रयत्न तब्बल अडीच तास करणे हे लोकशाही तत्वात बसणारे नाही. तसे करूनही विरोधकांना त्याबद्दल मुळीच पश्चात्ताप नाही, असे मोदी म्हणाले. राजकीय मतभेदांना बाजूला ठेऊन विधायक पध्दतीने सभागृहातील चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी सर्वपक्षीय खासदारांना केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्या केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केले.
अनेक खासदारांना तब्बल दहा वर्ष सभागृहात बोलण्याची संधी मिळालेली नाही. त्यांना त्यांच्या मतदारसंघातील अडचणी, मतदारांच्या भावना संसदेत मांडता आल्या नाही. विरोधकांपैकी काही पक्षांच्या नकारात्मक राजकारणामुळे संसदेचा बहुमूल्य वेळ वाया गेला आहे अशी टीका मोदी यांनी केली.
भारतीय स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होत असताना भारताला विकसित राष्ट्र घडविण्याचा आमचा संकल्प आहे. उद्या सादर होणारा अर्थसंकल्प ही त्याच दिशेने असेल. एक अतिशय मजबूत अर्थसंकल्प आणि सादर करू. अमृत काळातील हा अर्थसंकल्प आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या कार्याची दिशा ठरविणारा हा अर्थसंकल्प असणार आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.
