विशाळगड घटनेच्या निषेधासाठी सकल हिंदू समाजाचे आंदोलन
पुणे : गर्व आहे मला शिवभक्त असल्याचा…ऑफर ऑफर ऑफर गडकिल्ल्यावरील अतिक्रमण काढा आणि मिळवा शिवभक्तांचे एकगठ्ठा मतदान… विशाळगड अतिक्रमणमुक्त करा…अतिरेक्याला थारा शिवभक्तांना मारा…अशा घोषणा देत विशाळगड घटनेचा निषेध करण्यात आला. विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आणि हिंदुद्वेषी खासदाराच्या निषेधासाठी सकल हिंदू समाज पुणे यांच्यावतीने डेक्कन गुडलक चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे धीरज घाटे, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे श्रीकांत शिळीमकर, शिव समर्थ प्रतिष्ठानचे दिपक नागपुरे, धर्म जागरणाचे विवेक कुलकर्णी, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे, गोरक्षक शिवशंकर स्वामी, हिंदू युवा प्रबोधिनीचे लोकेश कोंढरे, पुण्येश्वर समितीचे किरण शिंदे, धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे भुषण वर्पे, समस्त हिंदू आघाडीचे अभिजीत वाघचौरे, बजरंग दलाचे नितीन महाजन, शिवशंभु ट्रस्टचे सम्राट चव्हाण यावेळी उपस्थित होते.
विशाळगडावर अतिक्रमण हटवावे आणि गडावर पशुहत्या कायमस्वरूपी बंदी करावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर सत्य परिस्थिती न तपासता पोलिस प्रशासन दिसेल त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करित आहे, याचा सकल हिंदू समाजाने तीव्र विरोध व्यक्त केला. शिवभक्तांवर गंभीर कलमे दाखल करून गंभीर प्रकारचे गुन्हे जे दाखल केले जात आहेत याचा सकल हिंदू समाज निषेध करत आहे. जर अशाच प्रकारे गुन्हे दाखल केले जात असतील तर यापुढील काळात सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.
विशाळगड घटनेबाबत सखोल चौकशी करून खरी परिस्थिती काय होती ते प्रशासनाने जाणून घ्यावे आणि ज्या मुस्लिम जमावाने शिवभक्तांवर पहिला सशस्त्र हल्ला केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी. फक्त हिंदू वर गुन्हे दाखल करू नयेत, तपास करताना एकतर्फी होऊ नये दोन्ही बाजू सखोल चौकशी करुन तपास व्हावा. खासदार शाहूंनी समस्त शिवभक्तांची व हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हिंदुत्ववादी संघटना, शिवभक्त आणि दुर्ग प्रेमी यांनी इतके वर्ष विविध आंदोलने करूनही या प्रकरणात प्रशासनानेही केलेल्या दिरंगाईमुळे हा उद्रेक झालेला आहे. या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित न करता सरसकट जमलेल्या शिवभक्तांवर गुन्हे दाखल करणे हे तीव्र निषेधार्ह आहे. दिसेल त्याला पकडून गुन्हे दाखल केले जात आहेत हे त्वरित थांबवावे.
आज जे अतिक्रमण प्रशासन काढत आहे हेच जर आंदोलन होण्याआधी काढले असते तर शिवभक्तांना हे आंदोलन करण्याची वेळच आली नसती. झाल्या प्रकाराला पुर्णपणे प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असेही यावेळी सांगण्यात आले.
