मुंबईची अदानी सिटी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव – उद्धव ठाकरे
मुंबई: धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या बदल्यात निविदेमध्ये नमूद नसलेल्या गोष्टी, बेसुमार टीडीआर, दहिसर नाका, कुर्ल्याची मदर डेअरीची जागा आणि मुलुंडच्या मिठागरांच्या जागा अदानींच्या घशात घालून मुंबईची अदानी सिटी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
… अन्यथा हा प्रकल्प होऊ देणार नाही
धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली तब्बल ५९० एकर जमीन अदानी समूहाला मिळणार आहे. धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही. टी एक मोठी औद्योगिक वसाहत आहे. त्या ठिकाणी घराघरात सूक्ष्म उद्योग चालतात. धारावीतील प्रत्येकाला धारावीमध्येच ५०० चौरस फूट जागा मिळाली पाहिजे. अन्यथा हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मुंबईला उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान …
पात्र, अपात्रतेच्या नावाखाली धारावीवासीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हा मुंबईचे नागरी संतुलन बिघडविण्याचा प्रयत्न असून तो आम्ही चालू देणार नाही. एकाही धारावीकराला तिथून हाकलू देणार नाही. मुंबईला उद्ध्वस्त करण्याचे, लुटून भिकेला लावण्याचे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही, असेही ठाकरे यांनी सुनावले.
लाडका ठेकेदार मित्र योजना
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी वारेमाप योजना जाहीर करत आहेत. मतदार या योजनांच्या भूलथापांना बळी पडतील अशी त्यांची समजूत आहे. मात्र, त्यांच्या या योजना सर्वसामान्य जनतेचे हित साधण्यासाठी नाही, तर त्यांच्या ठेकेदार मित्रांच्या तुंबड्या भरण्यासाठी आखलेल्या योजना आहेत, असा आरोपही ठाकरे यांनी केला.
