मंडई मधील भाजी विक्रेत्यांना रोटरीच्या छत्रछाया उपक्रमांतर्गत जंबो छत्रीचे वाटप
पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे साउथ च्या वतीने मंडई मधील भाजी विक्रेत्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. केवळ पावसाळ्यातच नाही तर सर्व ऋतूत भाजी विक्रेत्यांना या जम्बो छत्र्या उपयुक्त ठरणार आहेत.
महात्मा फुले मंडई परिसरातील ४० गरजू भाजी विक्रेत्यांना जम्बो छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे साउथचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. मंदार अंबिके, प्रियदर्शनी अंबिके, ज्येष्ठ सभासद गोविंदराव पटवर्धन सचिव हेमंत वाळिंबे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, सुरज थोरात, राजेश करळे आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
डॉ. मंदार अंबिके म्हणाले, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ च्या विविध उपक्रमांमधून समाजातील तळागाळातील, गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवली जाते. रोटरी क्लब पुणे डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या छत्रछाया उपक्रमांतर्गत मंडई भागातील ४० छोट्या भाजी विक्रेतांना जंबो छत्री देण्यात आल्या. पावसाळ्यात भाजी आणि स्वतःला पावसापासून संरक्षित ठेवण्यासाठी या छत्रीचा वापर होणार आहे.
अण्णा थोरात म्हणाले, महात्मा फुले मंडई परिसरात अनेक भाजी विक्रेते नियमित येतात. पावसाळ्यात भाजी विकताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते तसेच उन्हाळ्यात देखील रणरणत्या उन्हात उभे राहून आपला व्यवसाय करावा लागतो. यासाठी भाजी विक्रेत्यांना या जम्बो छत्र्या उपयुक्त ठरणार आहेत.
