Thursday, May 14, 2026
Latest NewsPUNE

कलाकाराचे सांगीतिक क्षेत्रातील योगदान हे चिरकाल टिकते

 

आषाढी एकादशी निमीत्त सुप्रसिद्ध गायक, संगीतकार डॉ भरत बलवल्ली यांचा वैष्णव पुरस्काराने सन्मान

पुणे  : कोणत्याही कलाकाराने संगीत क्षेत्रात संपादन केलेले यश (अचिव्हमेंट) हे केवळ सांगण्यापुरते आणि पुढील काळात बायोडेटामध्ये टाकण्यापुरते मर्यादित असते मात्र, कलाकाराचे सांगीतिक क्षेत्रातील योगदान हे मात्र चिरकाल टिकणारे असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायक, संगीतकार डॉ भरत बलवल्ली यांनी केले.

पुण्यातील कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने एरंडवणे येथील डॉ कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात आयोजित ‘नामाचा गजर’ या अभंग आणि संतरचनांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमात वैष्णव पुरस्काराने डॉ बलवल्ली यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

ह. भ .प विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जे व्ही इंगळे व त्यांच्या पत्नी मेघा इंगळे यांच्या वतीने दरवर्षी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे आठवे वर्ष असून पगडी, रोख रुपये २१ हजार व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. जे व्ही इंगळे यांच्या हस्ते सदर पुरस्कार डॉ बलवल्ली यांना प्रदान करण्यात आला. भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे सुपुत्र, आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, अभिषेक इंगळे, आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त मुकुंद संगोराम आदी यावेळी उपस्थित होते.

भारताला एक समृद्ध ज्ञानपरंपरा लाभली आहे आणि त्याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मी शक्य तेवढे योगदान देण्याचे काम करीत आहे, असे सांगत डॉ भरत बलवल्ली म्हणाले, “मी नुकताच रागोपानिषद नावाचा ग्रंथ सिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय संगीताचे श्रुतीविज्ञान आणि रागसंवाद शास्त्र याचा समावेश आहे. आपले भारतीय संगीत हे उपासना पद्धतीचे संगीत आहे. या ग्रंथामध्ये ३००- ४०० वर्षे आधीच्या बंदिशी साधारणपणे कशा होत्या याची माहिती आपल्याला मिळते.” या बंदिशींची हस्तलिखिते चेन्नई येथील तीर्थभद्र नावाच्या जैन मुनींनी मला दिली. लवकरच याचा मोठा ग्रंथ बनवून तयार होईल आणि तो प्रकाशित होईल, अशी माहितीही डॉ बलवल्ली यांनी दिली.

आपल्या ‘भरतवाक्य’ नावाच्या पुस्तकाबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की, “यामध्ये माझे सांगीतिक विचार, गाण्यामागील माझी विचार प्रक्रिया मी मांडली आहे. गुरूने शिकविलेले ज्ञान कसे ग्रहण करावे आणि विद्यार्थी म्हणून गायन कलेची विद्या कशी ग्रहण करावी, याचे अनुभव या पुस्तकात आहेत. याबरोबरच आध्यात्मिक मार्गक्रमण होत असताना माझ्या संगीत शिक्षणावर त्याचे कसे परिणाम झाले हे देखील या पुस्तकात दिले आहेत.” आध्यात्म, समाजकारण आणि संगीत यांचा एकत्रित अनुभव कसा असतो आणि त्यातून आपण कशा प्रकारे राष्ट्रनिर्माणाचे कार्य करू शकतो याबद्दल डॉ बलवल्ली यांनी सांगितले. डॉ भरत बलवल्ली यांच्या या पुस्तकाला भारतरत्न स्वरसम्राज्ञी गानकोकिळा लता मंगेशकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रस्तावना लाभली आहे हे विशेष.

गेल्या आठ वर्षांपासून कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने आम्ही वैष्णव पुरस्कार प्रदान करीत आहोत. ‘नामाच्या गजर’ या कार्यक्रमाद्वारे वारकरी संप्रदाय आणि त्याचा वारसा पुढे नेत असल्याचा आनंद आहे, असे जे व्ही इंगळे म्हणाले. आकाश थिटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading