विठ्ठलाच्या भक्तीमय गीतात रसिक दंग
पुणे : सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आणि सर्वोत्कर्ष ट्रस्ट यांचा संयुक्त विद्यमानाने आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाच्या भक्तीमय रचनांचा भजनरंग कार्यक्रम मोठ्या उत्साहात सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट गणेश मंदिर, सहकार नगर येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरवात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या “सुदंर ते ध्यान” या अभंगावरती शिल्पा दातार यांनी नृत्य सादर करून झाली. या कार्यक्रमात विठ्ठल भक्तीवरती विविध अभंग, गवळण, भावगीते आणि भक्ती गीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित राहिल्या होत्या.
या कार्यक्रमात गायक राजेश दातार आणि गायिका जयश्री कुलकर्णी यांनी “येग येग विठाबाई, अमृतहूनी गोड, माझे माहेर पंढरी, अबीर गुलाल उधळीत रंग, भुलविले वेणू नादे, पायी माझ्या रुतला काटा, अशी गीते सादर केली. तर कार्यक्रमाचे वाद्यवृंदाची साथ विजय दास्ताने – तबला, जयंत साने – हार्मोनियम, चारुशिला गोसावी व्हायोलिन, विनय दास्ताने साईड रिदम यांनी केली. यावेळी भगवंत विठ्ठल आणि आवली यांच्यावर प्रहसन सादर करण्यात आले होते.कार्यक्रमाचे निवेदन मधुरा टापरे यांनी केले तर आभार नितीन पाटील यांनी मानले.
