Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विधानसभा निवडणुक : राष्ट्रवादी काँग्रेस 80 जागा लढवणार

मुंबई : महायुती अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीत 80 जागा लढविण्याचे नियोजन केले असून या सर्व 80 च्या 80 जागांवर विजय मिळवण्याचा पक्षाचा निर्धार आहे. त्या दृष्टीने सर्व जागांवर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे, अशी माहिती अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

महायुती मधील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत अद्याप चर्चा झाली नसली तरीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 80 जागा लढवणार हे निश्चित केले आहे. आपण लढवत असलेल्या सर्व जागांवर विजय प्राप्त करण्यासाठी योग्य तो उमेदवार निवडला जाणार आहे. त्यासाठीच सर्वच जागांवर सर्वेक्षण सुरू आहे. महायुतीने सांगितल्यास 80 पेक्षा अधिक जागा लढवण्याचीही पक्षाची तयारी आहे, असे अत्राम यांनी सांगितले. विशेषतः ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील त्या जागांवर निवडणूक लढविण्याबाबत पक्ष आग्रही असणार आहे, असेही ते म्हणाले.

विदर्भात 20 जागा लढविणार 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात असली तरीही आगामी विधानसभा निवडणुकीत विदर्भात वीस जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा पक्षाचा निर्णय आहे, असे अत्राम यांनी सांगितले. या 20 पैकी सहा जागांवर सध्या पक्षाचे आमदार आहेत. इतर कोणत्या 14 जागांवर कोणता उमेदवार दिल्यास निश्चित विजय मिळेल, याची चाचणी पक्षाकडून केली जात आहे. 

देशमुख यांच्या विरुद्ध देशमुखांनाच उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात पक्षाने विशेष रणनीती आखली आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे सबळ उमेदवार नसेल तर देशमुख परिवारातील सदस्यांपैकी एकाला आपल्या पक्षात घेऊन त्यांना अनिल देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी देण्यासाठी अजित पवार गट तयार आहे, असे अत्राम यांनी सांगितले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading