Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आगामी विधानसभा निवडणूकीत ओबीसी बाजी मारतील – प्रकाश शेंडगे

सांगली: आगामी विधानसभा निवडणूक मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्यातच लढविली जाणार असून त्यात संख्याबळाच्या आधारावर आम्हीच विजय प्राप्त करू, असा दावा इतर मागावर्गीयांचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केला. विधानसभा निवडणुकीसंदर्भात इतर मागावर्गीय समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. 

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे आणि सगे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरागे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपुष्टात आली आहे. आपल्या मागण्यांसाठी 20 तारखेपासून पुन्हा उपोषण सुरू करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.  दुसरीकडे ओबीसी समाजानेही मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको या मागणीसाठी आरक्षण बचाव आंदोलनाची हाक दिली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीला जेमतेम 100 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास या निवडणुकीत सर्व 288 जागांवर आपला उमेदवार उभा करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यावर जरांगे पाटील जर त्यांचे उमेदवार उभे करणार असतील तर आम्ही देखील आमचे उमेदवार उभे करू, असे प्रतिआव्हान शेंडगे यांनी यापूर्वीच दिले आहे. त्यासाठी तब्बल 200 जागांवर आपले सर्वेक्षण पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. 

या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत समाज ओबीसी म्हणून प्रत्यक्षपणे सहभागी होणार असल्याचे शेंडगे यांनी सूचित केले. इतर मागास प्रवर्गात मोडणाऱ्या जातींची लोकसंख्या तब्बल 60 टक्के आहे. दलित आणि मुस्लिम समाज बरोबर आला तर ती 80 टक्के पर्यंत जाते. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे, असा दावा शेंडगे यांनी केला. यानंतर लवकरच पुन्हा एक भव्य मेळावा घेऊन निवडणूक लढविण्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading