वंचितची अजितदादांना आघाडीसाठी ऑफर
छत्रपती संभाजीनगर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडी सोबत यावे. आम्ही त्यांचे राजकीय वजन पुन्हा प्रस्थापित करू, अशी ऑफर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पवार यांना दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आंबेडकर यांनी ही ऑफर दिल्याने अजित पवार गटाकडून त्याला काय प्रतिसाद देण्यात येतो. याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
वंचित बहुजन आघाडी नेहमीप्रमाणेच विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगतानाच आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लोक महायुतीत आपल्याला वापरून घेतले जात असल्याचे सांगतात. वंचित बरोबर जाण्याची धमकी देतात. आम्हाला महायुती थांबवायचे असेल तर जागा वाढवून द्या, अशी मागणी करतात. अजित पवार यांनी खरोखरच आमच्या सोबत यावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
दंगली घडण्याची वाट बघू नका
राजकीय पक्षांनी संवेदशील विषयांवर भूमिका घेणे आवश्यक आहे. मराठा आरक्षण आणि इतर मागावर्गीयांचे आरक्षण ह संवेदनशील विषय आहे. परिस्थिती अतिशय स्फोटक आहे. दंगली घडून येण्याची वाट बघू नका. आपापल्या भूमिका स्पष्ट करा, असे आंबेडकर यांनी सर्व राजकीय पक्षांना सुनावले. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. त्यामुळेच ते आरक्षण य मुद्द्यावर ते भूमिका घेत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
जे पक्ष भूमिका घेत नाहीत ते आपल्या विरोधात आणि.श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत, अशी ओबीसींची भावना बनली आहे आणि आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून राजकीय पक्षांनी भूमिका जाहीर करावी. त्याशिवाय सरकार काहीही करणार नाही, असेही ते म्हणाले.
