Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

पं. संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने ९ व्या स्वरमल्हार महोत्सवाची सांगता

पुणे : मेवाती घराण्याचे ख्यातनाम गायक पं संजीव अभ्यंकर यांच्या राग गौडमल्हार आणि राग मेघच्या प्रस्तुतीने पुणेकर रसिकांनी खऱ्या अर्थाने स्वर’मल्हार’चा आनंद घेतला. निमित्त होते टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न झालेल्या ९ व्या स्वरमल्हार महोत्सवाच्या तिसऱ्या व शेवटच्या सत्राचे. स्वरमल्हारचे हे तिसरे सत्र सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुले होते.

टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमासाठी ओर्लीकॉन बालझर्स व्यवस्थापकीय संचालक प्रवीण शिरसे, विलास जावडेकर डेव्हलपर्सचे विलास जावडेकर, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटीव्ह सोसायटीचे वरिष्ठ व्यवस्थापक विजय परदेशी, व्हायोलिन अकादमीचे संस्थापक व प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये व राजस उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाच्या तिसऱ्या सत्राची सुरुवात नवोदित आश्वासक गायिका संयुक्ता अमरनाथ यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग यमन सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. यानंतर विद्या देसाई यांनी राग नंदमध्ये बहारदार प्रस्तुती केली. या दोघांनाही अजिंक्य जोशी यांनी तबल्यावर तर अभिषेक शिनकर यांनी संवादिनीवर साथसंगत केली.

यानंतर पं. संजीव अभ्यंकर यांनी राग पुरीया, राग गौडमल्हार, राग मेघ सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. राग पुरियामध्ये झपताल सादरीकरणाने त्यांनी सुरुवात केली. यामध्ये त्यांनी ‘अब थार बिन कुना मोरी राखे लाज…’ ही रचना सादर केली. ताल तीनतालमध्ये त्यांनी ‘रूप जोबनका मान ना करिए…’ ही बंदिश गायली. यानंतर राग गौडमल्हार मध्ये तीनतालात ‘आये बदरा कारे कारे…’ आणि एकतालमध्ये ‘बादर बरसावे बरसत बहु तेरी आली…’ या रचनांचे बहारदार सादरीकरण करीत रसिकांची मने जिंकली.

राग मेघ मधील विलंबित रूपक तालात सादर झालेल्या ‘मनवा नहीं माने बरखा रीतू अलसानी…’ या रचनेने स्वरमल्हार महोत्सवाचे हे तिसरे सत्र त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले. एकतालामध्ये ‘उमड़ घुमड़ घन गरजे, कारे कारे बदरा डराए…’ हा छोटाख़्याल प्रस्तुत करीत त्यांनी समारोप केला. पं संजीव अभ्यंकर यांना अजिंक्य जोशी (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी), डॉ विलीना पात्रा व साई पांचाळ (गायन व तानपुरा) यांनी साथसंगत केली. राजेश दामले यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading