Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

‘गंधर्वभक्तिरंग’ मधून उजळल्या बालगंधर्वांच्या स्मृती…

पुणे : संगीत सौभद्र, संगीत स्वयंवर, संगीत कान्होपात्रा यांमध्ये नटसम्राट बालगंधर्व यांनी गायलेल्या नाट्यगीतांच्या सादरीकरणाने बालगंधर्व यांच्या स्मृती जणू पुन्हा एकदा उजाळून निघाल्या. निमित्त होते नटसम्राट बालगंधर्व यांची पुण्यतिथी आणि आषाढी एकादशीनिमीत्त पुण्यातील सूर महती फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गंधर्वभक्तिरंग’ या कार्यक्रमाचे.

सूरमहती फाउंडेशनचे अध्यक्ष, डॉ वीणा सहस्रबुद्धे व पद्मश्री जयमाला शिलेदार यांचे शिष्य आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक अतुल खांडेकर यांच्या वतीने नवी पेठ येथील निवारा वृद्धाश्रम सभागृह या ठिकाणी नुकतेच ‘गंधर्वभक्तिरंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. यावेळी शशी इनामदार,  मानसी खांडेकर,  व्हायोलिनवादक रमाकांत परांजपे हे मान्यवर देखील आवर्जून उपस्थित होते.

केवळ गायकांच्याच नव्हे तर रंगकर्मींच्या व रसिकांच्याही अनेक पिढ्या ज्यांच्या गायनाने व अभिनयाने मोहित होऊन आनंदानुभव घेत आल्या, त्या नटसम्राट बालगंधर्वांच्या संगीत नाटकांमधील भक्तिरसाची  आणि आषाढी एकादशीनिमीत्त भक्तिमय वातावरणाची अनुभूती या कार्यक्रमाद्वार रसिकांना मिळाली.

‘गंधर्वभक्तिरंग’ या कार्यक्रमात स्वत: अतुल खांडेकर यांनी बालगंधर्व यांनी गायलेली नाट्यपदे सादर केली. संगीत सौभद्र मधील ‘कोण तुजसम सांग मज गुरुराया…’ या अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीत दिलेल्या नाट्यपदाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर ‘माझ्या जीवीचे जीवन तो हा विठ्ठल निधान…’ हा संत कान्होपात्रा यांचा अभंग त्यांनी गायला. ‘एकला नयनाला विषय तो झाला…’ हे मास्तर कृष्णराव यांनी संगीतबद्द केलेले संगीत स्वयंवरमधील नाट्यपद त्यांनी प्रस्तुत केले. ‘प्रेम सखा उधारी जीवाला…’ यासोबतच ‘धावत येई सख्या यदुराया…’ हे संगीत अमृतसिद्धी मधील मास्टर कृष्णराव यांनी संगीत दिलेले पद त्यांनी गायले.

अतुल खांडेकर यांनी सादर केलेल्या ‘जोहार मायबाप जोहार…’ या संत चोखोबांच्या संगीत कान्होपात्रामधील अभंगाला रसिकांनी दाद दिली. ‘प्रभू अजि गमला मनी तोषला…’ हे राम गणेश गडकरी यांच्या ‘एकाच प्याला’ नाटकातील नाट्यपदाने खांडेकर यांनी समारोप केला.

यावेळी प्रणव गोखले यांनी कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निरुपण केले. वरद सोहोनी, विभव खांडोळकर, प्रसाद भांडवलकर, प्रणव केसकर आणि भक्ति अतुल खांडेकर या कलाकारांनी साथसंगत केली. प्रणव राजवाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading