Big News : राज्यात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीचा प्रयोग?
मुंबई: विधानसभा निवडणुकीतील विजय निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीचे मत विभाजन करण्याच्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुढे करून राजकारणात तिसरी आघाडी उभी करण्याचा डाव भारतीय जनता पक्ष आखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे पानिपत घडवून आणले. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना लोकसभा निवडणुकीतील मतदारांचा कल कायम राहिल्यास महायुतीसाठी विधानसभा निवडणूक जिंकणे सोपे असणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला मिळणारी मते फोडण्यासाठी तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांची शेतकरी संघटना अशा छोट्या, मोठ्या पक्षांना एका छत्रीखाली आणून भाजप आणि शिवसेनेच्या पारड्यात न पडणारी महाविकास आघाडीची मते या तिसऱ्या आघाडीच्या पदरात पाडून घ्यायची, असे यामागचे नियोजन आहे.
निवडणुकीनंतर वंचित आणि एमआयएमसारखे पक्ष भाजपच्या पाठीशी उभे राहतील का, हा प्रश्न या निमित्ताने उभा राहणे स्वाभाविक आहे. मात्र, सध्याच्या अनाकलनीय राजकीय परिस्थितीत काहीही घडू शकते. पहाटेच्या शपथविधीपूर्वी अथवा एकदा या कृत्याला माफी मिळाल्यानंतरही पुन्हा अजित पवार खुद्द आपले काका शरद पवार यांच्या विरोधात बंड करून भाजपा बरोबर जातील अथवा शिवसेना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसेल असे कोणी स्वप्नात देखील पाहिले होते काय?
