विधान परिषद निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना टाळले?
मुंबई: मित्र पक्षांचे नेतेच नव्हे तर स्वपक्षीय नेत्यांसाठीही शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अनेक वेळा उपलब्ध नसतात, यावर अनेकदा चर्चा झडल्या आहेत. मात्र, राज्याच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी अशक्य वाटणारी मोट बांधणारे महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनाही उद्धव ठाकरे यांनी टाळल्याची माहिती उघड झाली आहे. विधान परिषद निवडणुकीदरम्यान पवार यांनी ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ठाकरे ‘अनरीचेबल’ असल्याची चर्चा आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या प्रभावावरून महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांवर टीका करण्यात आली.
दुसरीकडे संख्याबळाची खात्री नसतानाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उभे केलेले मिलिंद नार्वेकर हे उमेदवार काँग्रेसच्या अतिरिक्त मतांमुळे या निवडणुकीत विजयी झाले. या मतांसाठी शिवसेनेने काँग्रेसवर दबाव आणला. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची धमकीही दिली. त्याचवेळी अतिरिक्त मतांच्या नियोजनासाठी शरद पवार यांनी ठाकरे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते अनरीचेबल होते, अशी माहिती उघड होत आहे.
सलग पाच कार्यकाळ आमदार असलेल्या जयंत पाटील यांच्या पराभवामुळे सर्वाधिक टीका शरद पवार यांच्यावर करण्यात आली. पाटील यांच्या पराभवामुळे पवार यांनी शेतकरी कामगार पक्षच संपुष्टात आणला अशी टीका होत आहे. भाजपवर पक्ष पळविण्याची टीका करणारे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षच आपल्या छोट्या सहकारी पक्षांना संपविण्याच्या तयारीत आहेत, असा आरोपही खुद्द महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या माजी आमदार कपिल पाटील या शिक्षक भारतीच्या नेत्याने केला आहे.
