Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Big News : छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’ वर

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत नाशिकची उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज असलेले भुजबळ शरद पवारांची भेट घेत असल्याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाणे पसंत केले. त्याचे फळ म्हणून त्यांना राज्यात मंत्री पदही मिळाले. मात्र, भुजबळ यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा होती. नाशिक मधून आपण निवडणूक लढवा, असा निरोप आपल्याला दिल्लीहून मिळाल्याचा भुजबळ यांचा दावा आहे. मात्र महायुतीतील शिवसेना शिंदे गटाने नाशिकच्या जागेचा आग्रह धरल्याने भुजबळ यांना उमेदवारी मिळाली नाही. तेव्हापासून भुजबळ अस्वस्थ आहेत.  या अस्वस्थतेचा परिणाम म्हणूनच छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीला गेले का? छगन भुजबळ यांचा पुन्हा शरद पवार यांच्या गोटात सामील होण्याचा विचार आहे का, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा घडत आहेत. 

 मराठा समाजाकडून भुजबळ लक्ष्य 

छगन भुजबळ हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नाहीत तर ते इतर मागासवर्गाचे ही नेते आहेत. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी इतर मागासवर्गाचे मोठे संघटन बांधले आहे. सध्याच्या काळात राज्यात, विशेषतः ग्रामीण भागात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि इतर मागासवर्गात दुपारी निर्माण झाली आहे. मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये, अशी इतर मागास वर्गाची आग्रही मागणी आहे. त्यासाठी इतर मागासवर्गाचे नेते म्हणून भुजबळ आघाडीवर आहेत. त्यामुळे मराठा समाजाकडून, विशेषतः मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून भुजबळ यांना वारंवार लक्ष्य केले जात आहे. शरद पवार यांची राज्यातील राजकारणात व समाजकारणात दीर्घकाळ मराठा समाजाचे निर्विवाद नेते म्हणून ओळख आहे. या अनुषंगाने देखील छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट उल्लेखनीय आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading