Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

डॉ. निशिगंधा निकस यांच्या काव्यातून समाज घटकांची वीण पक्की होईल : भूषण कटककर


पुणे : ‌‘समुद्राच्या गोष्टी‌’ या कवितासंग्रहातील कविता अंतर्मनातील वैचारिक कोलाहल, प्रतिमांच्या सहाय्याने दूर करणाऱ्या आहेत. डॉ. निशिगंधा निकस यांच्या कवितांचा मूळ उद्देश सौहार्द टिकविणे आहे. चांगल्या काव्यनिर्मितीमुळे मनातील अस्वस्थता नष्ट होऊन समाज घटकांची वीण पक्की होण्यास मदत होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार, लेखक भूषण कटककर यांनी केले.

डॉ. निशिगंधा निकस लिखित ‌‘समुद्राच्या गोष्टी‌’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा महाजन यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कटककर अध्यक्षपदावरून बोलत होते. समग्र प्रकाशनचे संचालक दास पाटील, संचालिका अमिता पैठणकर व्यासपीठावर होते.

शुद्ध स्वरूपात अभिव्यक्त झालेली कविता वाचकाला मानवतेचे भान देते. नाती-गोती, संस्कृती, निसर्ग या सर्वांबाबत उदार दृष्टीकोन प्रदान करून समाजमन सुदृढ बनविते, असे नमूद करून कटककर पुढे म्हणाले, आजच्या काळात समाजमाध्यमांचा उद्रेक झाला आहे. अशा परिस्थितीत डॉ. निकस यांनी केलेले संयमित लिखाण वातावरणातील अस्वस्थता नष्ट करण्यास उपयुक्त ठरेल तसेच शाब्दीक तोडफोड न करता केलेल्या मुक्तछंदातील कविता हृदयस्पर्शी आहेत.

कवितासंग्रहाविषयी बोलताना डॉ. निशिगंधा निकस म्हणाल्या, घरात वाचन-लिखाणाची आवड असल्याने लहानपणापासूच लिहिती झाले. मनातील भावनांना वाट मिळावी म्हणून लिखाण करीत आहे. सुरुवातीस कथा-कादंबऱ्या लिहित होते; परंतु काही काळानंतर ग्रेस, सौमित्र यांचे साहित्य वाचनात आल्यानंतर कवितेतून व्यक्त होऊ लागले. कविता हे मानसिक अस्वस्थता व्यक्त करण्याचे, संकटांशी सामना करण्याचे, समाजातील अयोग्य गोष्टींवर प्रहार करण्याचे आणि आत्मिक समाधान देणारे साधन आहे.

प्रज्ञा महाजन म्हणाल्या, कलानिर्मिती ही व्यावहारिक गोष्ट नसून कला रसिकांसमोर आली की, त्याचा अंतिम हेतू हा आनंदच असतो. निशिगंधा यांना कविता गर्भसंस्कारातून मिळाली आहे आणि ते संस्कार त्यांच्या काव्यातून जाणवितात.
स्वागतपर प्रास्ताविकात दास पाटील म्हणाले, प्रकाशनाच्या माध्यमातून चांगली साहित्यकृती समाजासमोर ठेवावी म्हणून या काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले आहे. डॉ. निकस यांच्या मुक्तछंदातील कवितांमध्ये नवखेपणा जाणवत नाही. हा कवितासंग्रह रसिकांच्या पसंतीस उतरेल.
परिचय वैजयंती आपटे यांनी करून दिला तर सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित कविसंमेलनात वर्षा कुलकर्णी, अनुराधा काळे, भालचंद्र कुलकर्णी, मुक्ता भुजबले, योगिनी जोशी, शैलजा किंकर, माधुरी डोंगळीकर, रेखा कुलकर्णी, डॉ. दाक्षायणी पंडित, संदेश कुलकर्णी, वासंती वैद्य यांचा सहभाग होता. वासंती वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading