‘इसिस’च्या जाळ्यात माराठवाड्यातील 50 युवक
छत्रपती संभाजीनगर : इसिस या जागतिक दहशतवादी संघटनेचे जाळे मराठवाड्यात विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये खोलवर रुजले असल्याची माहिती उघड झाली आहे. छत्रपती संभाजी नगर मधील एका उच्चशिक्षित दहशतवादी युवकाला अटक करून त्याची सखोल चौकशी केल्यानंतर शहर आणि मराठवाड्यातील इतर ठिकाणी असलेले पन्नासहून अधिक युवक दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
संशयित हालचाली असल्यामुळे दीर्घ काळ नजर ठेवल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने फेब्रुवारी मध्ये छत्रपती संभाजी नगर येथील मोहम्मद शोएब या माहिती तंत्रज्ञान अभियंता असलेल्या युवकाला शी संबंध असल्याच्या कारणावरून अटक केली होती. शोएब हा बंगळुरू येथील माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करीत होता. सुमारे वर्षभर तू घरातूनच कंपनीचे काम करीत असे. याच काळात त्याने मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागातील तरुणांना धार्मिक आवाहन करून इसिसच्या जाळ्यात ओढून आणले.
शोएब हा त्याने निवडलेल्या युवकांना व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे धार्मिक कट्टरतेचे संदेश देऊन त्यांचे ‘ब्रेन वॉशिंग’ करीत असे. दहशतवादी विचारांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेल्या युवकांना त्याने स्फोटकांचा वापर करण्याचे प्रशिक्षणही दिले होते. या युवकांच्या माध्यमातून राज्यातील विविध संवेदनशील ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याचा त्याचा कट होता. हा कट पूर्णत्वाला गेल्यानंतर अफगाणिस्तान अथवा तुर्कस्तान येथे पलायन करण्याचा डावही त्याने आखला होता. त्याच्या अटकेनंतर दहशतवादी संघटनेचे मराठवाड्यातील जाळे उघड झाले आहे.
