Thursday, September 24, 2026
Latest NewsPUNE

श्रवणदोषाकरिता योग्य वयात श्रवणयंत्र मिळण्याची आवश्यकता – अनुराधा पौडवाल

पुणे : श्रवणदोष असणा-यांना प्रत्येक कार्यक्रमात साधारणत: २५० जणांना आम्ही श्रवणयंत्र देतो. आजमितीस अनेकांना यंत्र येऊन देखील शेकडो जणांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. योग्य वयात हे श्रवणयंत्र मिळायला हवे. समाजात मोठया संख्येने लोकांना ऐकू येत नाही. ती समस्या आपण समजून घेत, त्यावर मात करण्याकरिता प्रयत्न करायला हवे, असे मत प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाऊंडेशन, मुंबई व महाट्रान्सको यांच्या संयुक्त विद्यमाने जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तब्बल ३२७ मूकबधिर मुले व नागरिकांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले.

यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, तुषार रायकर, अमोल चव्हाण, विजय चव्हाण, संतोष रसाळ, सुवर्णयुग सहकारी बँकेचे राहुल चव्हाण आदी उपस्थित होते. सूर्योदय फाऊंडेशनच्या माध्यमातून अनुराधा पौडवाल याविषयी जनजागृती करीत आहेत.

अनुराधा पौडवाल म्हणाल्या, श्रवणदोष असणा-यांना श्रवणयंत्र देणे हे आवश्यक असले, तरी देखील जेव्हा मुलाचा जन्म होतो, तेव्हाच ही तपासणी करुन आवश्यकतेनुसार उपचार करणे गरजेचे आहे. याकरिता प्रसुती करणा-या डॉक्टरांशी संपर्क साधून आम्ही हा संदेश पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपक्रमाबाबत ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सूर्योदय फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत आहे. आजपर्यंत ४५०० हजार श्रवणयंत्रांचे वाटप आपण केले आहे. आणखी ११०० गरजूंना वाटप करणे बाकी आहे. केवळ पुण्यातच नाही, तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरुनच समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचे दिसून आले आहे. जी मुले आर्थिकदृष्टया दुर्बळ आहेत, त्यांना विनामूल्य श्रवणयंत्र दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading