कलाकार आणि त्यातील माणूस असे वेगळे काढता येत नाहीत – सचिन खेडेकर
पुणे :आपल्याकडे कलाकार आणि त्यातील माणूस हे एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत. कलाकार जसा आहे तशीच त्याची कला दिसत राहते. अगदी स्वतः कलाकाराने देखील यामध्ये अमुलाग्र बदल घडवायचा प्रयत्न केला तर ते उपरे वाटते, उसनवारीचे वाटते आणि लोकांना ते ओळखताही येते. वास्तूरचनाकार, चित्रकार, कवी, लेखक असलेले शिरीष दसनूरकर यांची कला अशीच आहे. त्यांची कला ही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणेच सभ्य आणि निखळ आहे, असे मत प्रख्यात अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केले. पुण्यातील प्रसिद्ध वास्तूरचनाकार शिरीष दसनूरकर लिखित ‘शिरीषाक्षरे’ पुस्तकाचे प्रकाशन खेडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
शिरीष दसनूरकर यांनी रेखाटलेल्या निवडक जलरंग व अॅक्रॅलिक चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. सचिन खेडेकर, चारुहास पंडित यांबरोबरच शिरीष दसनूरकर, त्यांचे मित्र संजय बोरा आदी यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते. दसनूरकर यांच्या पुस्तकाच्या ऑडीओ बुकचे प्रकाशन देखील यावेळी खेडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सेंटरमधील राजा रवी वर्मा कलादालन येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून १३ व १४ जुलै रोजी सकाळी १० ते सायं ७ दरम्यान हे चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले विनामूल्य खुले असेल.
एखाद्याला एखादी गोष्ट किती छान, किती सहज यावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिरीष दसनूरकर आहेत असे मला वाटते. मित्रांनी सांगितले चित्रे काढली, कविता कर म्हणाले कविता केली, लिहिते झाले असे त्यांचे व्यक्तीमत्त्व आहे. दसनूरकर यांच्या या व्यक्तिमत्त्वाचा मला हेवा वाटतोय असे सांगत सचिन खेडेकर म्हणाले, “कलेचा स्पार्क जिवंत राहण्यासाठी मन तरल आणि मनस्वी लागते. एखाद्या गोष्टीवर प्राणापलीकडे श्रद्धा लागते. तेव्हाच मनात असलेले सत्यात उतरू शकते. शिरीष दसनूरकर यांचे मन असेच तरल आणि मनस्वी आहे. आज आपल्या जगण्यात प्रचंड गोंधळ आहे त्यात सुद्धा स्वतःला ताजे आणि तरल ठेवणे हा गुण दसनूरकर यांच्याकडे आहे असे मला वाटते.”
मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या अभिनय क्षेत्रात अभिनय ही कला परावलंबी आहे. कुणीतरी लिहावे लागते, कोणीतरी दिग्दर्शन करावे लागते. असा उठून स्वतः हून अभिनय करता येत नाही. दसनूरकर यांची कला हे ‘सोलो आर्ट’ आहे. कुणाचीही मदत न घेता ते या कलेचा आनंद घेऊ शकता. याचे कौतुक मला आहे, असेही खेडेकर म्हणाले.
प्रत्येक कलाकृती ही सर्वसमावेशक असतेच असे नाही. त्यामुळे त्यातील काहीतरी आपल्या प्रत्येकाला आवडण्याजोगे असते. त्यातले आपल्याला जे आवडते ते पाहण्याची सवय जशी कलाकाराला असते तशी, आता ती प्रेक्षकांनीही करून घ्यायला हवी आहे असे खेडेकर म्हणाले. कलाकृती निरखून पाहताना अरे हे राहून गेले, अरे हे अजून असे असते तर चांगले झाले असते असा विचार प्रेक्षक करीत राहिले तर त्या कलाकृतीची मजा निघून जाते असे मला वाटते. पारखून घेतले की कुणीच आपले नसते, आणि समजून घेतले तर कोणीही परके नसते अशी भावना प्रेक्षकांनी बाळगायला हवी, असे खेडेकर यांनी सांगितले.
या पुस्तकाच्या रूपाने शब्दांचा कॅलिडोस्कोप बघतोय असा माझा अनुभव होता असे सांगत चारुहास पंडित म्हणाले, “एकेका शब्दांचे विविध रंग आणि छटा मी या पुस्तकात अनुभविल्या. दसनूरकर यांची चित्रे ही जलरंगातील असल्याने त्या रंगांचे वैशिष्ट्य हे प्रवाही आहे, पारदर्शक तरीही रंगीत छटांचे आहे. दसनूरकर यांचे व्यक्तीमत्त्व येथे चित्र आणि शब्दांमधून व्यक्त होते. त्यांची कला ही स्वांत सुखाय आहे ही महत्त्वपूर्ण बाब आहे, असे मला वाटते. थोड्याच व्यक्तींना हे जमते.”
शिरीष दसनूरकर यांचे हे पुस्तक म्हणजे कलात्मक आणि साहित्यिक वारी आहे असे सांगत संजय बोरा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मेक माय ड्रीम फाऊंडेशनला शिरीष दसनूरकर यांनी रुपये १ लाखांचा मदतीचा धनादेश सुपूर्त केला. शिरीष दसनूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले तर नैना लिमये आभार प्रदर्शन केले.
शिरीष दसनूरकर हे व्यवसायाने प्रतिथयश वास्तूरचनाकार असून व्यवसायापलीकडे जाऊन चित्रातून आणि लेखणीतून व्यक्त होणारा अवलिया अशी यांची ओळख आहे. या प्रदर्शनामध्ये त्यांनी रेखाटलेली तब्बल १०० जलरंग व अॅक्रॅलिक मधील निसर्गचित्रे चित्रप्रेमींना पाहता येणार येणार आहेत. ‘’
