महाविकास आघाडी 225 जागांवर विजय प्राप्त करेल – शरद पवार
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तापरिवर्तन अटळ असून महाविकास आघाडीच सत्ता हाती घेईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. एवढा दावा करून पवार थांबले नाहीत तर महायुतीला धूळ चारून महाविकास आघाडी या निवडणुकीत तब्बल 225 जागांवर विजय प्राप्त करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लातूर जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने चमकदार कामगिरी केली. पक्षाने 10 जागांवर निवडणूक लढवून आठ जागांवर विजय प्राप्त केला. ही तर केवळ सुरुवात आहे. विधानसभा निवडणुकीत 288 पैकी तब्बल 225 जागांवर विजय मिळवून महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर येईल, असे पवार म्हणाले. शेतकरी, कामगार, शेतमजूर, व्यापारी अशा सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन आपण राज्याचा विकास करणार आहोत, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
ज्यांना जनतेने आणि पक्षाने मान दिला, मोठेपणा दिला त्यांनीच आमचा घात केला. मात्र, लोकसभा निवडणूक झाल्यापासून अनेक जण पुन्हा माघारी येत आहेत. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर महाविकास आघाडीला पर्याय नाही, हे अनेकांना उमगू लागले आहे. त्यामुळे ते परत येत आहेत, अशा शब्दात पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला.
