भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही
मुंबई : सुरक्षिततेच्या कारणासाठी भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नाही, या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ठाम असून आगामी चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे सामने दुबई किंवा श्रीलंका येथे खेळवले जावे, अशी सूचना नियामक मंडळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेला करू शकते, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.
यावर्षी खेळवल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने त्याचे वेळापत्रकही निश्चित करून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेला सादर केले आहे. भारतीय संघाच्या सुरक्षेची हमी घेऊन त्या दृष्टीने भारताचे सर्व सामने लाहोर येथे खेळवण्याचे नियोजन पाकिस्तान क्रिकेट मंडळाने केले आहे. मात्र, भारताचा संघ पाकिस्तानात पाठवला जाणार नाही, अशी बीसीसीआयची ठाम भूमिका आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संबंध बहुतांश वेळा ताणलेले राहिले आहेत. भारतीय क्रिकेट संघाने सन 2008 नंतर पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. यापूर्वी सन 2023 मध्ये पाकिस्तानकडे यजमानपद असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यास भारताने नकार दिला होता. त्यावर पर्याय म्हणून या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये विभागून देण्यात आले. त्यावेळी भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले गेले. आगामी चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धेबाबतीतही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे तेच धोरण कायम आहे.
