Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

उस्ताद शाहीद परवेज व पं अतुलकुमार उपाध्ये यांची सतार- व्हायोलिन जुगलबंदी आणि राहुल देशपांडे यांच्या गायनाने रंगला स्वरमल्हार महोत्सवाचा दुसरा दिवस

 

पुणे : सतार व व्हायोलिन यांची बहारदार जुगलबंदी, राहुल देशपांडे यांनी सादर केलेला राग मियां मल्हार यांमुळे ९ व्या स्वरमल्हार महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. याबरोबरच युवा गायक निसर्ग पाटील आणि कथक नृत्यांगना निकिता बानावलीकर यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी पसंती दिली.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे संपन्न झालेल्या स्वरमल्हारच्या या दुसऱ्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर, ओर्लीकॉन बालझर्स व्यवस्थापकीय संचालक प्रवीण शिरसे, एचआर व सीएसआर विभाग प्रमुख सचिन कणसे, विलास जावडेकर डेव्हलपर्सचे दादा तरंगे, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटीव्ह सोसायटीचे सचिन झगडे व संजय मोघे, द नेचर- मुकाईवाडीचे सुशील देशमुख, व्हायोलिन अकादमीचे संस्थापक व प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये व राजस उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात निसर्ग पाटील यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मेघची प्रस्तुती केली. ‘आयी बरखा झूम झूम…’ या त्यांनी सादर केलेल्या रचनेने उपस्थितांची मने जिंकली. ‘बित जात बरखा ऋत…’ ही राग देस मधील बंदिश सादर करीत त्यांनी समारोप केला. निसर्ग पाटील यांना पांडुरंग पवार (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), श्रीनिवास केंचे व ओंकार लोहार (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

यानंतर निकिता बानावलीकर यांच्या कथक नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी शिववंदनेने आपल्या नृत्य सादरीकरणाला सुरुवात केली. तीन तालमध्ये त्यांनी तोडे, तुकडे, विलंबित रचना यांची बहारदार प्रस्तुत केली. तीन तालातील परण, तिश्र आणि चतुश्र जातीच्या रचना, अनागत बंदिश त्यांनी सादर केली. ‘सावन आये, जियरा तरसे’ या रचनेवर नृत्य सादर करीत तीन तालातील ततकार प्रस्तुतीने त्यांनी समारोप केला. निकिता बानावलीकर यांना तनय रेगे (तबला), शुभदा गायकवाड (संवादिनी), आदित्य आपटे (गायन) यांनी साथसंगत केली.

यानंतर राहुल देशपांडे यांच्या गायनाने उपस्थितांना राग मियां मल्हारची अनुभूती दिली. राहुल यांनी राग मियां मल्हारमध्ये विलंबित एक तालात ‘करीम नाम तेरो…’ ही बंदिश गायली. यानंतर उस्ताद शराफत अली यांचा तराणा प्रस्तुत केला. ‘बोले रे पपैहरा…’ ही रचना सादर करीत त्यांनी उपस्थितांची वाह वाह मिळविली. कुमार गंधर्व यांची राग कामोद मधील ‘ऐसन कैसन बरसत बरखा…’ बंदिश व आपले आजोबा पंडीत वसंतराव देशपांडे यांनी गायलेली ‘बरसन लागी सावन बुंदिया राजा…’ ही ठुमरी सादर केली. कुमार गंधर्व यांनी संगीतबद्ध केलेले गोरक्षनाथांचे ‘गुरुजी मैं तो एक निरंजन ‘ हे निर्गुणी भजन गात राहुल देशपांडे यांनी समारोप केला. राहुल देशपांडे यांना निखिल फाटक (तबला), तन्मय देवचके (संवादिनी) तर नारायण खिलारे, निमिष उत्पात, ऋषिकेश पाटील यांनी तानपुरा साथ केली.

कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात उपस्थितांनी पंडित अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन) आणि पद्मश्री शाहिद परवेज (सतार) यांच्या जुगलबंदीची अनुभूती घेतली. या दोघांनी कोमल निषादमध्ये राग जोग कंसची बहारदार प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी आलाप, जोड, झाला सादर केले. रूपक, तीनताल आणि द्रुत तीनतालमध्ये गत सादर केली. खमाज धून प्रस्तुतीने त्यांनी समारोप केला. यावेळी मुकेश जाधव तबला तर आदित्य देशपांडे यांनी तानपुरा साथ केली. राजेश देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading