Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बाळासाहेब मला माफ करा.. – वसंत मोरे

पुणे : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून वंचित बहुजन आघाडीत गेलेले वसंत मोरे लवकरच शिवबंधन परिधान करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आपण ‘बाळासाहेब मला माफ करा..’, असा निरोप पाठवला, असेही वसंत मोरे यांनी सांगितले.

मोरे म्हणाले, कोणत्याही प्रलोभनासाठी आपण शिवसेनेत जात नाही. विधानसभा निवडणूक लढवायची की महापालिका लढवायची, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी जबाबदारी सोपवतील ती जबाबदारी पार पाडण्यास मी तयार आहे. कार्यकर्त्यांचा विचार करून ९ जुलै रोजी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार आहे. यापूर्वी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवली आहे. हा पक्षांतराचा निर्णय घेण्यापूर्वी बाळासाहेबांनी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यांना केवळ, बाळासाहेब मला माफ करा, असा निरोप पाठवला आहे.

म्हणून शिवसेनेत प्रवेश .. 

मी मूळचा शिवसैनिकच आहे. केवळ 18-19 वर्षाचा असताना मी शिवसेनेची शाखा स्थापन केली. त्यानंतर एक दशकाहून अधिक काळ मी शिवसैनिक राहिलो. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित कडून निवडणूक लढवीत असताना अनेकांनी आपले काम केले नाही. याबद्दल पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली होती. या गोष्टीबद्दल आपले कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर नाराज होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विचार करून त्यांना बळ देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करीत आहोत, असे मोरे यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा चंग बांधलेले वसंत मोरे यांनी मनसेकडून तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर वंचित बहुजन आघाडी प्रवेश करून ही निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. तरीही विधानसभा निवडणूक लढविण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे. केवळ एकाच नव्हे तर खडकवासला आणि हडपसर अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी त्यांनी आता शिवसेना ठाकरे गटाची कास धरली आहे.

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading