शासकीय योजना लोककल्याणा ऐवजी राजकीय लाभांसाठी – आमदार रोहित पवार
मुंबई: शासकीय योजना लोकांच्या कल्याणाऐवजी केवळ राजकीय लाभ उठवण्यासाठी राबविल्या जाणार असतील तर आम्ही ते सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे.
मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजना घोषणेपासूनच वादग्रस्त ठरली आहे. पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देणारी ही योजना महिलांच्या काळजीमुळे नव्हे तर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणली असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मात्र, सरकार या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आग्रही असून अंमलबजावणीतील अडचणी आणि लोकांच्या मागण्या लक्षात घेऊन पात्रतेचे निकष अधिकाधिक सैल केले जात आहेत. आता विरोधकांनी योजनेच्या अर्जावरील नेत्यांच्या छायाचित्रांवरून सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी करण्याच्या अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासहमंत्री आदिती तटकरे यांचे छायाचित्र आहे. शासकीय योजनेच्या अर्जावर अशाप्रकारे नेत्यांची छायाचित्र प्रसिद्ध करण्यास रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. आगामी निवडणूक नजरेसमोर ठेवून सरकार या योजनेचा वापर करून घेत आहे सरकार या योजनेचा एवढा गाजावाजा करत असले तरीही प्रत्यक्षात या योजनेसाठी केवळ दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद अत्यंत तोकडी आहे. यावरूनच सरकारचा ही योजना राबविण्यात मागचा हेतू प्रामाणिक नसल्याचे दिसून येत आहे, असे रोहित पवार यांनी नमूद केले.
राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने मतदारांची दिशाभूल करणारी ही योजना अमलात आणली आहे. वास्तविक शासकीय योजना या जनतेच्या कल्याणासाठी राबविल्यास आणि अपेक्षित आहे. सत्ताधारी राजकीय लाभ उठविण्यासाठी शासकीय योजनांचा उपयोग करून घेत असतील तर ते आम्ही सहन करून घेणार नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
