हिंदू समाजात फूट पाडणारे राहुल गांधी हेच खरे दहशतवादी – रामदास आठवले
नवी दिल्ली: खोटा प्रचार करून हिंदू समाजात फूट पाडणारे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हेच खरे दहशतवादी आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर आरोप करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपतींचे अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर सरकून टीका केली. देशासमोरील अनेक प्रश्नावरून सरकारवर टीका करतानाच त्यांनी, स्वतःला हिंदू म्हणविणारे 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवित आहेत, असा आरोप भाजप आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केला.
मात्र, राहुल गांधी यांनी समस्त हिंदू समाजाला दहशतवादी ठरविण्याचा आरोप करून सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकेचा भडीमार केला. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ अजूनही कायम आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेतूनही त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आठवले यांनीही राहुल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेतला. राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी यापूर्वी खोटा प्रचार करून हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान, भारतीय जनता पक्षाचे 400 पेक्षा अधिक खासदार निवडून आले तर ते संविधान बदलणार, असा तद्दन खोटा प्रचार त्यांनी देशभर केला. त्यामुळे हिंदू समाजात फूट पडण्याची वेळ आली. त्यांना मोदी आणि भाजपा यांच्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही. खोटा प्रचार करून समाजात फूट पडणारे राहुल गांधी आणि काँग्रेस हेच खरे दहशतवादी आहेत, अशी टीका आठवले यांनी केली.
