Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

सत्संग सोहळ्यात चेंगराचेंगरी, 87 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधल्या हाथरसमध्ये एक दुर्देवी दुर्घटना घडली आहे. एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 87 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये  महिला आणि मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार हाथरसमधल्या रतीभानपूरमध्ये  एका सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रम सुरु असतानाच अचानक अफरातफरी उडाली. यावेळी चेंगराचेंगरी  होऊन महिला आणि लहान मुलं चिरडली गेली. यात अनेकजण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रतीभानपूरमध्ये भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शेकडोच्या संख्येने भक्त सहभागी झाले होते. गर्दी आणि प्रचंड उष्णतेने अनेक भक्त बेशुद्ध पडले. त्यामुळे अफरातफरी माजली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशानस दाखल झाले. गंभीर अवस्थेत अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार सत्संग सोहळ्यात प्रचंड गर्दी होती. बाहेर पडण्याचा रस्ताही लोकांमुळे जाम झाला होता. त्याचवेळी भक्तांमध्ये धक्काबुक्की झाली. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून आपल्या आईचीही प्रकृती गंभीर असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. सत्संग संपल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. प्रत्येकाला एकाचवेळी बाहेर पडायचं होतं, असंही काही जणांनी सांगितलं.

हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी आशिष कुमार पटेल यांनी सांगितले की, 50 ते 60 मृतदेह हातरस येथे आणण्यात आले आहेत. एटा सीएमओनुसार, आतापर्यंत 27 मृतदेह एटामध्ये पोहोचले आहेत. एसएसपी एटा राजेश कुमार यांनी सांगितले की, एटाला पोहोचलेल्या 27 मृतदेहांमध्ये 23 महिला, तीन मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 87 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 150 लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना बस-तंबूत भरून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डीएम आणि एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत. याशिवाय अनेक पोलिस ठाण्यांचे फौजफाटाही घटनास्थळी पाचारण करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading